औरंगाबाद : भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी गेल्यावर्षी आजच्या दिवशी सरकार स्थापन केलं होतं. त्यावरून सोशल मीडियावर दोन्ही नेत्यांची खिल्ली उडवली जात आहे. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी सूचक विधान केलं आहे. आता पहाटे नाही तर योग्य वेळीच शपथ दिसेल, असं विधान फडणवीस यांनी केल्याने पुन्हा एकदा तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.
औरंगाबादमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस यांनी हे सूचक विधान केलं आहे. ठाकरे सरकार हे बेईमानी करून आलेलं सरकार आहे. हे सरकार किती काळ टिकेल हे माहीत नाही. यावर आता बोलणं योग्य नाही. मात्र, या पुढे पहाटे शपथ घेणार नाही. योग्य वेळी शपथ घेतली जाईल, असं सूचक विधान करतानाच अशा गोष्टी आठवणीत ठेवायच्या नसतात, असं ते म्हणाले. तसेच ज्या दिवशी सरकार पडेल त्या दिवशी राज्यात दुसरं सरकार देऊ, असं विधानही त्यांनी केलं आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज हे सूचक विधान केल्याने पुन्हा एकदा राज्यातील सत्ताबदलाच्या चर्चांनी जोर धरला आहे. त्याआधीही दिवाळीनंतर राज्यात शंभर टक्के ऑपरेशन लोटस होणार असल्याचा दावा करून भाजप नेते नारायण राणे यांनी खळबळ उडवून दिली होती. भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यांकडूनच सत्ताबदलाचे संकेत दिले जात असल्याने राज्यात आगामी काळात मोठ्या घडामोडी घडणार असल्याचं बोललं जात आहे.
* संजय राऊतांची टीका
महाराष्ट्रातील भाजपच्या पुढाऱ्यांचे ताळतंत्र सुटलंय. पहाटेच्या शपथविधीला एक वर्ष झालं आहे. अमावस्येच्या फेऱ्याला एक वर्ष पूर्ण झालंय. भाजप नेते भ्रमिष्ठ झाले आहेत. महाराष्ट्रातील जनतेने त्यांच्याकडे लक्ष देऊ नये, अशी घणाघाती टीका शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपवर केली.
महाराष्ट्रातील भाजप नेते पातळी सोडून टीका करत आहेत. शरद पवार हे छोटे नेते आहेत असं भाजप नेते म्हणाले, मग नरेंद्र मोदी यांच्या सरकारने शरद पवारांना पद्मविभूषण पुरस्कार दिला मग मोदी सरकारला कळत नाही का?”, असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.