मुंबई : आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत खरिप पणन हंगाम 2020-21 मधील खरेदी केलेल्या धानासाठी केंद्र शासनाने निश्चित केलेल्या दराव्यतिरिक्त धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर प्रति क्विंटल सातशे रुपये देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजूरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. या निर्णयामुळे 1400 कोटी रुपये इतका अतिरिक्त खर्च येईल.
खरीप हंगाम 2020-21 साठी केंद्र शासनाने धानाची आधारभूत किंमत साधारण धानासाठी 1868 रुपये व ग्रेड धानासाठी 1888 रुपये इतकी निश्चित केली आहे. मात्र, धान उत्पादक शेतकरी अडचणीत असल्यामुळे प्रोत्साहनपर राशी देण्याचा निर्णय घेण्यात आला. केवळ ऑनलाईन खरेदी होणाऱ्या धानासाठीच ही राशी मिळेल. या वर्षी 1 कोटी 78 लाख क्विंटल इतकी अपेक्षित धान खरेदी होईल.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* शुक्रवारपासून कापूस खरेदी केंद्रे सुरु
राज्यातील कापूस खरेदी केंद्रे सुरु करून त्यांच्यामार्फत कापूस खरेदीस सुरुवात होत आहे. यासंदर्भात काल मंत्रिमंडळ बैठकीत पणन विभागाचे प्रधान सचिव यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक महासंघाद्वारे पहिल्या टप्प्यामध्ये शुक्रवार( ता. 27 )पासून एकूण 16 कापूस उत्पादक जिल्ह्यातील 21 केंद्रामध्ये तसेच 33 जिनिंग मिलमध्ये कापूस खरेदी केंद्र सुरु करण्यात येत आहेत.
दुसऱ्या टप्प्यामध्ये निविदेस प्रतिसाद न मिळालेल्या बीड, परभणी आणि जळगाव अशा 3 जिल्ह्यात 9 कापूस खरेदी केंद्रे डिसेंबर 2020 च्या पहिल्या आठवड्यामध्ये सुरू होणार आहेत.
यंदा कापूस पेरा 42.86 लक्ष हेक्टरमध्ये झालेला असून एकूण 450 लक्ष क्विंटल पर्यंत कापूस उत्पादन होण्याची शक्यता आहे. याबाबत केंद्रीय कापूस खरेदी निगम (CCI) आणि महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक महासंघ यांच्यातर्फे खरेदीचे तंतोतंत नियोजन करण्यात आले आहे.