मुंबई : मुंबईतल्या बीडीडी चाळीतल्या सुवर्णा कुराडेने उंच गगण भरारी घेतली आहे. आपल्या जिद्दीच्या आणि कष्टाच्या बळावर मुंबईकर सुवर्णा कुराडे ही आता नासामध्ये रुजू झाली आहे. बीडीडी चाळीतील मुंबईकर मुलीचे हे यश मुंबईकरांना प्रेरणादाई ठरत आहे.
१८० स्क्वेअर फुटांच्या घरात राहून तिने एक स्वप्न पाहिलं. नासा या जागतिक किर्तीच्या संशोधन संस्थेत काम करण्याचं. ते स्वप्न पूर्ण झालं आहे. कारण मुंबईकर सुवर्णा कुराडे ही आता नासामध्ये रुजू झाली आहे. “माहिती आणि तंत्रज्ञानावर माझं अफाट प्रेम आहे. त्यात जे काही शिकता ते सगळं शिकण्याचा प्रयत्न होता. याचेच फलित म्हणून मी आज नासात आहे” असं सुवर्णा सांगते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सुवर्णा कुराडे यांचे वडील पोलीस खात्यात होते. सुवर्णा यांनी मुंबईतल्या बीडीडी चाळीत राहून पालिका शाळेतून शिक्षण घेतलं. सुवर्णा यांना गुरु म्हणून मारुती शेरेकर भेटले. तेव्हा त्यांच्याही शिक्षकी पेशाची सुरुवात झाली होती. त्यांच्यासोबतच धनाजी जाधव यांनीही सुवर्णामध्ये चुणूक आहे हे ओळखलं. या दोघांनीही तिला अतिरिक्त शिकवणी देण्यास सुरुवात केली. १९९५ मध्ये सुवर्णाने दहावीच्या परीक्षेत ८८.१४ टक्के गुण मिळवले. त्यातही इंग्रजी विषयात सुवर्णाला ९० गुण मिळाले होते.
सुवर्णा यांनी वांद्रे पॉलिटेक्निकमधून त्यांचा इंजिनीअरिंग डिप्लोमा पूर्ण केला. मग तेथेच काही काळ नोकरी करीत कम्प्युटर इंजिनिअरींगचे शिक्षण पूर्ण केले. विवाहानंतर त्या अमेरिकेत गेल्या. अमेरिकेत नोकरी करताना त्यांनी शिक्षण मात्र थांबवले नाही. त्यांनी विविध व्यावसायिक प्रमाणपत्र अभ्यासक्रमांच्या पातळी पूर्ण केल्या. तिची ही शैक्षणिक गुणवत्ता लक्षात घेत ‘नासा’ने त्यांची क्लाउड कम्प्युटिंग प्रकल्पात माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात काम करण्यासाठी निवड केली आहे.
“कोणतीही गोष्ट कधीही कमी लेखू नका, मी स्वतःशीच स्पर्धा करत राहिले, त्यामुळे मी नासामध्ये काम करते आहे. असं असलं तरीही मला आणखी खूप शिकायचं आहे. पालिकेच्या शाळेत शिकणारा विद्यार्थी असो किंवा अन्य कोणत्याही शाळेतील विद्यार्थी प्रत्येकांनी आपल्या मनातला विद्यार्थी सतत जागृत ठेवावा यश हमखास मिळते”
– सुवर्णा कुराडे