हैदराबाद : ग्रेटर हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाने आपल्या बड्या बड्या नेत्यांना प्रचारासाठी रिंगणात उभं केलं आहे. त्यामुळे निवडणुकीचं वातावरण चांगलंच तापलं आहे. योगी आदित्यनाथ भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी हैदराबादेत आहेत. प्रचारादरम्यान त्यांनी हैदराबादचं नाव भाग्यनगर करण्याचं आश्वासन दिलं.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी काल शनिवारी तेलंगानाची राजधानी हैदराबादमध्ये ग्रेटर हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचारासाठी मलकजगिरी भागात रोड शो केला. यावेळी त्यांनी एआयएमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांना लक्ष्य केले. या रोड शोला प्रचंड गर्दी होती.
“इथं आल्यानंतर मला अनेकांनी हैदराबादचं नाव भाग्यनगर होऊ शकतं का? असं विचारलं. मी त्यांनी म्हटलं का नाही? आम्ही फैजाबादचं नाव अयोध्या केलं, अलाहाबादचं नाव प्रयागराज केलं. उत्तर प्रदेशात भाजपाची सत्ता आल्यानंतर हे बदल घडले मग हैदराबादचं नाव भाग्यनगर का होणार नाही?” असे योगी आदित्यनाथ म्हणाले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
ओवेसी यांनी या निवडणुकीसाठी येथे 51 उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. हैदराबाद महापालिका निवडणुकीतही असदुद्दीन ओवेसी यांनी जुन्या हैदराबाद भागातही आपल्या पक्षाचे उमेदवार मैदानात उतरवले आहेत. भाजपाला प्रचंड बहुमताने विजयी करण्यासाठी पुढे येण्याचं आवाहन देखील त्यांनी या वेळी केलं.
* केसीआर यांचा हल्लाबोल
तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि तेलंगणा राष्ट्र समिती पक्षाचे प्रमुख के. चंद्रशेखर राव यांनी हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हैदराबादमध्ये प्रचारसभा घेऊन नाव बदलण्याचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर केसीआर यांनी त्यांना फटकारलं आहे. देशात दरडोई उत्पन्नाबाबत 28 व्या क्रमांकावर असलेलं पिछाडीवरील राज्य 5 व्या क्रमांकाच्या राज्याला शिकवण्याचा प्रयत्न करतंय, असं म्हणत केसीआर यांनी खोचक टोला लगावला. तसेच हैदराबादमध्ये काही विभाजनवादी शक्ती शिकाव करत असल्याचं सांगत हैदराबादला वाचवा, असं आवाहन जनतेला केलं आहे. ते हैदराबादमधील एल. बी. स्टेडियमवर बोलत होते.
केसीआर म्हणाले, ‘काही विभाजनवादी शक्ती हैदराबादमध्ये शिरकाव करत आहेत आणि येथील शांतता बिघडवत आहेत. आपण त्यांना हे करु देणार आहोत का? आपण आपली शांतता भंग होऊ देणार आहोत का? तेलंगणाचा मुख्यमंत्री म्हणून मी हैदराबादमधील जनतेला आवाहन करतो की त्यांनी पुढे यावं आणि टीआरएस या पुरोगामी विचाराच्या पक्षाला पाठिंबा द्यावा. हैदराबादला विभाजनवादी पक्षांपासून वाचवा.’
हैदराबादमध्ये पूरस्थिती तयार झाली तेव्हा तेलंगणा सरकारने 1300 कोटी रुपयांच्या आर्थिक मदतीची मागणी केली होती. पण केंद्र सरकारने 13 रुपये देखील मदत केली नाही. दुसरीकडे मोदी सरकार एलआयसी, रेल्वे आणि भारत हेव्ही इलेक्ट्रिकल्ससारख्या (BHEL) नफ्यातील यशस्वीपणे वाटचाल करणाऱ्या सरकारी कंपन्या विकत आहेत,’ असंही केसीआर यांनी म्हटलं.