पुणे, 11 एप्रिल (हिं.स.)।
संतोष देशमुख हत्या प्रकरणात जशी क्रूरता होती, तशीच क्रूरता ही दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने पैशासाठी दाखविल्याने गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. राज्य सरकारने या धर्मादाय रुग्णालयाचे संचालक मंडळ बरखास्त करून तेथे शासनाचे प्रतिनिधी नियुक्त करावेत. पोलिसांनी रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईलचे सीडीआर तपासून रुग्णालयातील डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
पुणे काँग्रेस भवनात आयोजित पत्रकार परिषदेत सपकाळ बोलत होते. शहराध्यक्ष अरविंद शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, माजी आमदार रमेश बागवे, दीप्ती चवधरी आदी यावेळी उपस्थित होते.
सपकाळ म्हणाले, दीनानाथ मंगेशकर रुग्णालय हे धर्मादाय आहे, त्यामुळे सरकारने येथील संचालक मंडळ बरखास्त करून हा दवाखाना ताब्यात घ्यावा. चीनच्या युद्धाच्या वेळेस लता मंगेशकर यांनी ‘ए मेरे वतन के लोगो’ हे गाणे म्हणेल, त्यावेळी भारताच्या पंतप्रधानांच्या डोळ्यातूनही पाणी आले होते. त्यानंतर सर्व सरकारांनी मंगेशकर कुटुंबीयांवर खूप प्रेम केले.
लता मंगेशकर यांच्या विरोधामुळे मुंबईतील उड्डाणपूल रद्द केला. पण आत याच मंगेशकरांचा संबंध असलेल्या दवाखान्याकडून मूल्य पायदळी तुडवले जात आहे. चौकशी समित्यांचे अहवाल येतीलच पण सरकारने मोबाईल सीडीआर तपासून व सीसीटीव्ही तपासून डॉ. केळकर व डॉ. घैसास यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा.
‘महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी बहुजनांचा उद्धार करण्यासाठी कार्य केले. पण त्यांना छळणारे, चिखलफेक करणारे इंग्रज नव्हते तर भारतीयच होते. फुले चित्रपटातून हेच दाखविण्याचा प्रयत्न केला जात असताना केंद्र व राज्य सरकार सेंसर बोर्डाच्या माध्यमातून या चित्रपटातील दृश्यांना कात्री लावत आहे, अशी टीकाही सपकाळ यांनी केली.