दुबई, 3 ऑगस्ट – सप्टेंबरमध्ये होणाऱ्या आशिया कपचे सामने दुबई आणि अबू धाबी येथे खेळवले जाणार आहेत. सामन्यांच्या वेळापत्रकाची घोषणा झाली असून भारताचा सामना दुबईच्या मैदानावर पाकिस्तानशी होणार आहे. आशिया कप ९ सप्टेंबरपासून सुरू होऊन २८ सप्टेंबरपर्यंत रंगणार आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील साखळी स्पर्धेतील सामना १४ सप्टेंबर रोजी दुबईमध्ये होणार आहे. दोन्ही संघांमधील सुपर सिक्स स्टेजचा संभाव्य सामना २१ सप्टेंबर रोजी त्याच ठिकाणी खेळला जाईल. २८ सप्टेंबर रोजी होणारा अंतिम सामनाही दुबईमध्येच होणार आहे. पुढील वर्षी भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा टी-२० आंतरराष्ट्रीय स्वरूपात खेळवली जाईल.
एसीसीने २६ जुलै रोजी सामन्यांची घोषणा केली होती आणि आता सामन्यांचे ठिकाण निश्चित झाले आहे. या स्पर्धेतील एकूण १९ सामन्यांपैकी ११ सामने दुबईमध्ये आणि आठ सामने अबू धाबीमध्ये खेळवले जातील. भारत आपले सुरुवातीचे दोन साखळी सामने १० सप्टेंबरला युएईविरुद्ध आणि १४ सप्टेंबरला पाकिस्तानविरुद्ध दुबईमध्ये खेळेल. तर ओमानविरुद्धचा शेवटचा साखळी सामना १९ सप्टेंबर रोजी अबू धाबी येथील शेख झायेद स्टेडियमवर होईल.