आज भाद्रपद शुक्ल पक्ष तृतीया या श्री हरतालिका पुजन आहे.
श्रीहरतालिका व्रत पूजन माहिती
श्रीगणेश चतुर्थींच्या आदल्या दिवशी म्हणजे भाद्रपद शुद्ध तृतियेला “श्रीहरतालिका` असे म्हणतात.
या दिवशी पार्वती मातेची पूजा महिला करतात. हरतालिका या शब्दाची फोड “हरित` म्हणजे “हरण` करणे आणि “आलिका` म्हणजे “आलिच्या`-मैत्रिणीच्या असा आहे.
मैत्रिणींच्या साह्याने पार्वतीने केलेले शंकराचे हरण, असा या शब्दाचा अर्थ आहे.
हिंदू संस्कृतीत कुमारिका आपल्याला हवा असलेला, आपल्या मनासारखा पती मिळावी म्हणून “हरतालिका` हे व्रत अत्यंत मनापासून मनोभावे करतात. काही जणी हे व्रत कडक करतात. आपल्याकडे विवाहित स्त्रिया हे व्रत करतात. विवाह झाल्यानंतर इच्छित पती मिळाल्यानंतर ही करतात कारण एकदा घेतलेले शंकराचे व्रत मोडू नये अशी महिलांची श्रद्धा असते म्हणून त्याही हे व्रत आजन्म करतात.
हिमालयाचा राजा हिमवान याची पार्वती ही कन्या. पर्वताची कन्या म्हणून तिचे नाव “पार्वती` असे ठेवण्यात आले. तिचे लग्न कोणाबरोबर करावे अशी काळजी त्याला लागली होती. एकदा नारदमुनी हिमवानाकडे आले आणि त्याला म्हणाले, “हे पर्वतश्रेष्ठा ! तुझ्या या सुस्वरुप मुलीला मागणी घालण्यासाठी भगवान विष्णूंनी मला तुझ्याकडे पाठविले आहे. ते ऐकून हिमवानाला आनंद झाला. त्याने पार्वतीला ती बातमी सांगितली. पण पार्वतीने मनोमन कैलासराणा शंकराला पती म्हणून वरले होते. तसे प्रत्यक्ष पित्याला स्पष्टपणे सांगण्याचे धैर्य तिला झाले नाही. तिने आपल्या मैत्रिणींबरोबर आपल्या पित्याला निरोप पाठवला. “तुम्ही माझा दुसऱ्या कोणाबरोबरही विवाह करून दिला तर मी जीव देईन.`
पार्वती आपल्या मैत्रिणींसह अरण्यात निघून गेली. तिथे तिने घोर तपश्चर्या केली. नदीकाठी वाळूचे शिवलिंग तयार करून ती त्याची पूजा करू लागली. प्रथम ती फक्त झाडाची कोवळी पाने खाऊन राहत होती. पुढे तिने तेही सोडून दिले. त्यामुळे तिला “अपर्णा` असे नाव पडले. तिच्या तपश्चर्येने भगवान श्रीशिवशंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी तिला वर मागायला सांगितले. ती म्हणाली, “तुम्ही माझ्या तपश्चर्येमुळे खरोखर प्रसन्न झाला असाल, तर माझे पती व्हा.` शंकराने “तथास्तु` म्हटले व निघून गेले. पार्वतीचा शोध घेत हिमवान त्या अरण्यात आला. तिला त्याने घर सोडून येण्याचे आणि तपश्चर्येचे कारण विचारले. तेव्हा तिने आपला दृढ निश्चय आपल्या वडिलांना सांगितला.
भगवान श्रीशंकरांनी दिलेला वरही सांगितला.तिचा दृढनिश्चय, श्रद्धा पाहून हिमवानाने तिचा विवाह भगवान श्री शंकराशी करून दिला. पार्वतीची निष्ठा आणि श्रद्धा व भक्ती यांचा विजय झाला. पार्वतीच्या शंकरावरील निष्ठेमुळे, प्रेमामुळे शंकराला “पार्वतीपती` असे नामाभिधान पडले.
इच्छित पती शंकराची प्राप्ती पार्वतीने आपल्या मैत्रिणींच्या साह्याने प्राप्त करून घेतली. पार्वतीने आपला वर कडक तपश्चर्येने मिळविला. त्याप्रमाणे मनाजोगता पती मिळावा म्हणून हिंदू कुमारिका, महिला हे व्रत श्रद्धापूर्वक करतात. या दिवशी दिवसभर उपवास करतात. काही जणी तर दिवसभरात पाण्याचा थेंबही तोंडात घेत नाहीत.
रात्री 12 वाजता बेलाचे पान चाटून, काही जणी रुईच्या पानावर मध लावून ते पान चाटून, तर कोणी खडीसाखर, केळी यांसारखे अगदी थोडेसेच खाऊन उपवास करतात. अर्थातच ज्यांना इतके कडक व्रत करता येत नाही. त्या स्त्रिया उपवासाचे पदार्थ खाऊन व्रत करतात.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या व्रताच्या वेळी स्वच्छ केलेल्या जागेवर एका जागी चौरंग ठेवतात. केळीच्या खांबांनी चारही बाजूंनी सुशोभित केलेल्या चौरंगावर पार्वती आणि शंकराची स्थापना करून त्याची षोडशोपचारे पूजा करतात. धूप-दीप, नैवेद्य दाखवून वेगवेगळ्या प्रकारची पत्री (पाने), फुलांची पूजा केली जाते. धूप-दीप, निरांजन दाखविला जातो. हरतालिकेच्या पूजेत जी पत्री वाहतात. त्यात जाई, शेवंती, पारिजातक , तुळशी, रुई, शमी, दुर्वा, आघाडा, चाफा, केवडा, डाळिंबाची पाने वाहतात. मनोभावे प्रार्थना करतात. “सखे पार्वती, तुला जसा इच्छित वर मिळाला तसा आम्हाला मिळू दे. अखंड सौभाग्य लाभू दे`, अशी प्रार्थना करून आरती केली जाते.या दिवशी पूजा झाल्यावर सुवासिनी, कुमारिका रात्रभर जागरण करतात. झिम्मा, फुगडी, टिपऱ्या, गोफ इत्यादी खेळ खेळतात.
व्रत कोणी व का करावे
कुमारीना सुयोग्य वर प्राप्तीसाठी , सुवासिनींना अखंड सौभाग्य प्राप्ती ही पुजा करावी आणि उपवास करावा.
पूजाकाल :-
भाद्रपद शुद्ध तृतीयेस प्रथम प्रहरात ही पूजा करावी ( संध्याकाळी पुजा करावी )
व्रताचार : ही पूजा अविवाहित व विवाहित अशा सर्वच स्त्रिया करतात . ह्या दिवशी उपवास करावा. रात्री यथाशक्ति जागरण करून देवीचे भजन व आरती करावी
पूजेच्या देवता कोणत्या मांडाव्या (नंदीची रेती/समुद्राची वाळूनी पुजा
मांडावी चौरंगावर)
पार्वती व हरिताली: मृत्तिकेच्या मूर्ती व वाळूचे शिवलिंग, नंदी, पार्वती, श्रीगणेश, गंगा,
पुजेला पत्री कोणत्या पाहीजे:-
पत्र पूजेतील क्रमानुसार – कमळ फुल,
बेल 108, आघाडा, मधुमालती, दूर्वा, चाफा, कण्हेर, बोर, रुई, तुळस, आंबा, डाळिंब, धोतरा, जाई, मरवा, बकुळ, अशोक इत्यादी(उपलब्धि प्रमाणे)
सौभाग्य वायन साहित्य
परडीत/पत्रावळीवर – हळदकुंकू, तांदूळ, वस्त्र, पानसुपारी, नाणे, नारळ, गजरा/ वेणी, शिधा तसेच, फणी, काजळ, गळेसरी, कांकणे, आरसा इत्यादी
सौभाग्यद्रव्ये
पुजा साहित्य
अत्तर, हळदकुंकू , चंदनगंध, अष्टगंध, गुलाल, बुक्का, अक्षता, रांगोळी , उदबत्ती, कापूर, आगपेटी, सुटीनाणी ६ , तुपाच्या व तेलाच्या वाती, कापसाची मालावस्त्रे – १६ मण्यांचे १ व ५ मण्यांचे 1, तांदूळ (वाटीभर) पंचामृत ( दूध , दही , तूप , मध , साखर ) गूळखोबरे , नैवेद्य , सुंठवडा ( डिंकवडा ), चौरंग/पाट , आसन, पाण्याचा कलश, घंटा, समई, नीराजने, कापूरारती, पळीपंचपात्र , ताम्हण, देव पुसण्याचे वस्त्र , हातपुसणे , तसराळे, पेलाभर उष्णोदक .
फुले, दूर्वा, तुलसीपत्रे, विड्याची पाने 25, सुपारी ६, बदाम ५, खारका ५, नारळ 2, फळे 7, केळी ५, पेढे/खडीसाखर
पुजन केल्यावर ही कहाणी वाचावी…
श्री हरतालिका कहाणी
जसा नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ, ग्रहात सूर्य श्रेष्ठ, , देवात विष्णु श्रेष्ठ, ग्रहात सूर्य श्रेष्ठ, नद्यांत गंगा श्रेष्ठ, त्याप्रमाणं हरितालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे.
एके दिवशी ईश्वरपार्वती कैलास पर्वतावर बसली होती. पार्वतीनं शंकराला विचारलं, “महाराज, सर्व व्रतात चांगलं ब्रत कोणतं? श्रम थोडे आणि फळ पुष्कळ, असं एकादं व्रत असलं, तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याईनं आपल्या पदरी पडले हेही मला सांगा.” तेव्हा शंकर म्हणाले, “जसा नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ, ग्रहात सूर्य श्रेष्ठ, चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, देवात विष्णु श्रेष्ठ, ग्रहात सूर्य श्रेष्ठ, नद्यांत गंगा श्रेष्ठ, त्याप्रमाणं हरितालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे ते तुला सांगतो. तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालीस ते ऐक.हे व्रत भाद्रप्रद महिन्यातला पहिल्या तृतीयेला करावं. ते पूर्वी तू केलस ते मी तुला आता सांगतो. तू लहानपणी ‘मी तुला प्राप्त व्हावे’ म्हणून मोठं तप केलंस. चौसष्ट वर्षे तर झाडाची पिकलेली पानं खाऊन होतीस. थंडी, पाऊस, ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस. हे तुझे श्रम पाहून तूझ्या बापाला फार दुःख आणि ‘अशी कन्या कोणास द्यावी?’ अशी त्याला चिंता पडली. इतक्यात तिथं नारदमुनी आले. हिमालयानं त्यांची पूजा व येण्याचं कारण विचारलं. तेव्हा नारद म्हणाले, “तुझी कन्या उपवर झाली आहे, ती विष्णूला द्यावी. तो तिच्यायोग्य नवरा आहे. त्यांनीच मला तुजकडे मागणी करण्यास पाठविलं आहे. म्हणून इथं मी आलो आहे.”
हिमालयाला मोठा आनंद झाला. त्यानं ही गोष्ट कबूल केली. नंतर नारद तेथून निघून विष्णूकडे आले. त्यांना ही हकीकत कळविली व आपण निघून दुसरीकडे गेले. नारद गेल्यावर तुझ्या बापानं ती गोष्ट तुला सांगितली, ती गोष्ट तुला रुचली नाही. तू रागावलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागावण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलंस, ‘महादेवावाचून मला दुसरा पती करणं नाही’ असा माझा निश्चय आहे. असे असून माझ्या बापानं मला विष्णूला देण्याचं कबुल केलं आहे. ह्याला काय उपाय करावा? मग तुझ्या सखीनं एका घोर अरण्यात नेलं. तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली. जवळच एक गुहा आढळली. त्या गुहेत जाऊन तू उपास केलास. तिथं माझी लिंग पार्वतीसह स्थापिलंस. त्याची पूजा केलीस. तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता. रात्री जागरण केलंस. त्या पुण्यानं इथलं माझं आसन हाललं, नंतर मी तिथं आलो. तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं. तू म्हणालीस, “तुम्ही माझे पती व्हावं, याशिवाय दुसरी इच्छा नाही,” नंतर ती गोष्ट मी मान्य केली व गुप्त झालो.
दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा तू विसर्जन केलीस. मैत्रिणीसह त्याचं पारण केलंस. इतक्यात तुझा बाप तिथे आला. त्यानं तुला इकडे पळून येण्याचं कारण विचारलं. मग तू सर्व झालेली हकीकत त्याला सांगितलीस. पुढं त्यानं तुला मलाच देण्याचं वचन दिलं. तुला घेऊन घरी गेला. मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केलं. अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली याला ‘हरितालिका व्रत’ असं म्हणतात. याचा विधी असा आहे.
“ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं. केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं. पुढं रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं. षोडशोपचारे त्याची पूजा करावी. मनोभावे त्याची प्रार्थना करावी. नंतर ही कहाणी करावी व रात्री जागरण करावं. या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो. साती जन्माचं पातक नाहीसं होतं. राज्य मिळतं. स्त्रियांचं सौभाग्य वाढतं. ह्या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं, तर त्या जन्मवंध्या व विधवा होतात. दारिद्र्य येतं व पुत्रशोक होतो. कहाणी केल्यावर सुवासिनींना यथाशक्ति वाण द्यावं. दुसरे दिवशी उत्तरपूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं.”
ही साठा उत्तराची कहाणी, पांचा उत्तरी, देवाब्राह्मणाचे द्वारी, गाईचे गोठी, पिपळाच्या पारी, सुफळ संपूर्ण.
कहाणी झाल्यावर फलाहारचा नेवैद्य दाखवून आरती करावी
* ज्योतिष राहुल नारायणराव पुराणिक
* ज्योतिष आकाश नारायणराव पुराणिक
९८२३३१६१७९
जालना