नवी दिल्ली, 22 जुलै – महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आज (दि. २२ जुलै) आपला ६६ वा वाढदिवस साजरा करत आहेत. या निमित्ताने संपूर्ण राज्यभरातून त्यांना शुभेच्छांचा वर्षाव होत असून अनेक राजकीय नेत्यांसह कार्यकर्त्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही ‘एक्स’ (माजी ट्विटर) या समाजमाध्यमावरून शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले –
“महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! एनडीएच्या विचारधारेला राज्यात अधिक बळकटी देण्यात श्री. पवार यांचे योगदान उल्लेखनीय आहे. त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो.”
त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील शुभेच्छा देताना लिहिले –
“अजित पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. महायुती सरकारच्या कार्यांना बळकटी आणि वेग देण्यामध्ये त्यांची भूमिका प्रशंसनीय आहे. त्यांच्या उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी मी प्रार्थना करतो.”
या शुभेच्छांचा स्वीकार करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोघांचेही आभार मानले. आपल्या प्रतिक्रियेत त्यांनी म्हटले –
“आदरणीय पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांचा स्नेह माझ्यासाठी अत्यंत मोलाचा आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मी महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि जनतेच्या कल्याणासाठी कटिबद्ध आहे.”
राज्याच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध स्तरांतील शुभेच्छांचा ओघ सुरूच आहे.
