सोलापूर, 11 एप्रिल (हिं.स.)।
सोलापूर महापालिका हद्दीतील जगजीवन राम झोपडपट्टीमध्ये घडलेल्या दुर्दैवी घटनेबद्दल चिंता व्यक्त करून महापालिकेच्या आरोग्य व पाणीपुरवठा विभागाने भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले. सोलापूर महानगरपालिकेच्या इंद्र भवन येथील मिटींग हॉलमध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर महानगरपालिकेच्या आढावा बैठक घेण्यात आली.
पालकमंत्री गोरे पुढे म्हणाले की, महापालिकेने या भागातील शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करावी. आणि आवश्यक असल्यास त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवावे. शालेय विद्यार्थ्यांना आरोग्य सुविधा देण्याबाबत हलगर्जी करू नये असे निर्देशित करून ड्रेनेज लाईनमध्ये पिण्याच्या पाण्याच्या लाईनच्या समस्येवरील उपाय योजनेसाठी तातडीने 2 कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही त्यांनी दिली. तसेच यावेळी मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधून मृत विद्यार्थ्यांना पाच लाख रुपये देण्याचा प्रस्ताव पाठवण्याचे आदेशही पालकमंत्री गोरे यांनी दिले.
याशिवाय, जगजीवन राम झोपडपट्टीमध्ये 15 ते 20 दिवस आरोग्य तपासणी उपलब्ध करून देण्याची सूचना करण्यात आली. या ठिकाणी कायमस्वरूपी दवाखाना सुरू करण्याबाबतही निर्देश दिले गेले. बैठकीच्या प्रारंभी महापालिकेचे आयुक्त सचिन ओंबासे यांनी आरोग्य विभागाच्या माध्यमातून जगजीवन राम झोपडपट्टी येथे सुरू असलेल्या सर्वेक्षणाबद्दल माहिती दिली. या सर्वेक्षणात पाणी तपासणी, फवारणी, दुरावणी यांचा समावेश आहे.
तसेच, बाधीत क्षेत्रांमध्ये फिरता दवाखाना सुरू करण्यात येणार आहे, तसेच पाण्याच्या पुरवठ्यासाठी असलेल्या पाईपलाईन काही ठिकाणी ड्रेनेज लाईनमधून जात आहेत, ज्यामुळे दूषित पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. यावर उपाय म्हणून संबंधित विभागाला पाईपलाईन बदलण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत आणि निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.