सोलापूर, 1 मे (हिं.स.)। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे सर्वांसाठी घर हे स्वप्न आहे. हे स्वप्न साकार करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याला 20 लाख घरकुलाचे उद्दिष्ट प्राप्त करून घेतले आहे. सोलापूर जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेचा टप्पा- 2 सुरू झालेला असून चालू आर्थिक वर्षात या योजनेतून 62 हजार 950 घरकुले मंजूर केलेली आहेत. बेघर लाभार्थ्यांचा आवास प्लस 2024 चे सर्वेक्षणाचे कामही सुरू आहे. तरी जिल्ह्यातील एकही बेघर लाभार्थी सर्वेक्षणापासून वंचित राहणार नाही याची दक्षता सर्वांनी घ्यावी, असे आवाहन ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले.
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 66 व्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते सकाळी 8.00 वाजता पोलीस परेड ग्राउंड, पोलीस आयुक्त मुख्यालय, सोलापूर येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ संपन्न झाला, याप्रसंगी ते मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलिस शहर आयुक्त एम. राजकुमार, सोलापूर महापालिका आयुक्त सचिन ओंबासे, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, आमदार देवेंद्र कोठे, अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकुर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, उपजिल्हाधिकारी महसूल संतोषकुमार देशमुख, पोलिस उपायुक्त अजित बोराडे यांच्या सह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
—————