जालना, 2 ऑगस्ट – मराठवाड्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या छत्रपती संभाजीनगर-परभणी या रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाला अखेर केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. दक्षिण मध्य रेल्वे विभागांतर्गत येणाऱ्या या सुमारे 177.29 किलोमीटर लांबीच्या मार्गासाठी तब्बल 2,179 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा प्रकल्प अनेक वर्षांपासून प्रलंबित होता, मात्र माजी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला.
या दुहेरीकरणामुळे छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांना मोठा फायदा होणार आहे. यामुळे प्रवासी तसेच मालगाड्यांची वाहतूक अधिक वेगवान व वेळापत्रकानुसार होईल. हा संपूर्ण मार्ग 2030 पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
दुहेरी ट्रॅक झाल्यामुळे मालगाड्यांसाठी स्वतंत्र मार्ग उपलब्ध होणार असून शेतमाल व औद्योगिक माल वाहतुकीत मोठी सुधारणा होईल. नागपूर-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर, लॉजिस्टिक्स पार्क, कोल्ड स्टोअरेज, गोदामे आणि नवीन उद्योगांना चालना मिळेल.
माजी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी या प्रकल्पासाठी रेल्वे मंडळ व मंत्रालय पातळीवर सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या दूरदृष्टी व लोकहिताच्या बांधिलकीमुळेच हा प्रकल्प मंजुरीस आला आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मराठवाड्याच्या आर्थिक, औद्योगिक आणि सामाजिक विकासाला नवे बळ मिळणार आहे.
स्थानिक नागरिक आणि जनप्रतिनिधींनी दानवे यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले असून, मराठवाड्याच्या प्रगतीस चालना देणारे विकासाभिमुख नेतृत्व म्हणून त्यांची प्रतिमा अधिक बळकट झाली आहे.