सोलापूर, 30 मे (हिं.स.)। कोरोनाचा संसर्ग आता पंढरीच्या वेशीवर येऊन ठेपला आहे. माळशिरस तालुक्यातील अकलूज आणि माळीनगर येथे दोन नवे कोरोनाचे संशयित रूग्ण आढळून आले आहेत. कोरोना रूग्ण आढळून आल्याने आषाढी वारीवर सावट निर्माण झाले आहे. या नव्या संकटामुळे आरोग्य विभागातही मोठी खळबळ उडाली आहे.
येत्या 18 जून रोजी संत तुकाराम, तर 19 जून रोजी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. पालखी सोहळ्यात लाखो भाविक सहभागी होतात. येत्या सहा जून रोजी आषाढीचा मुख्य सोहळा साजरा होणार आहे.
आषाढी वारीसाठी देशभरातून लाखो भाविक पंढरीत विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी येतात. अशातच आता संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील अकलूज आणि माळीनगर या गावात कोरोनाचे रूग्ण आढळून आल्याने चिंता वाढली आहे. येथील दोन्ही संशयित कोरोना बाधीत रूग्णांवर खासगी रूग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती माळशिरसच्या वैद्यकीय अधिकारी प्रियंका शिंदे यांनी दिली.