खास प्रतिनिधी
सोलापूर : येथील महापालिका परिसरातील ‘सीबीएस’सी पॅटर्नच्या प्रसिद्ध शाळेत घडलेल्या पाच वर्षीय बालिकेच्या लैगिक शोषणाच्या गंभीर प्रकरणात शाळेच्या टॉलेट परिसरातील सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध नसणे आणि शाळेत ‘तसे’ काहीच घडले नसल्याचा प्राचार्यांयांनी केलेला कांगावा, चौकशी प्रकरणी जबाब देण्यासंबंधी शिक्षक आणि कर्मचार्यांवर टाकलेला दबाव हे सर्व पाहता या प्रकरणाला वेगळ्याच संशयाचा वास येत आहे. घडलेले गंभीर प्रकरण असतानासुद्धा ते दडपण्याचा शाळा व्यवस्थापन आणि प्राचार्य यांच्याकडून प्रयत्न सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात पोलिसांकडून होणार्या चौकशी दरम्यान सॉफ्ट कॉर्नर मिळावा, बालंट अंलट येऊ नये, यासाठी शाळा व्यवस्थापनाकडून वरिष्ठ स्तरावरुन वशिलेबाजी केली जात असल्याची माहितीदेखील समोर येत आहे.
ज्या नामांकित शाळेत हा गंभीर प्रकार उघडकीस आला, त्या शाळेत अवघ्या 20 दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध आहेत, यातूनच जादा संशय बळावत आहे. सहा महिन्यांपासून वासनांध नराधम शिपाई टॉलेट परिसररात जाऊन त्या चिमुरडीचे लैंगिण शोषण करत होता, या दरम्यानचे त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज काढले, तर सगळे सत्य समोर येणार आहे. मात्र, अवघ्या 20 दिवसांचे फुटेज उपलब्ध असल्याचे सांगण्यात येत आहे. फुटेज गेले कुठे? हा ‘कळी’चा मुद्दा आहे. शाळा व्यवस्थापन आणि प्राचार्य यांच्याकडून हे लैंगिक अत्याचाराचे गंभीर प्रकरण दडपण्याचा ज्या पद्धतीने घाट घातला जात आहे, त्यावरुन सहा महिन्यांच्या सीसीटीव्ही फुटेजचीसुद्धा जाणीवपूर्वक वाट लावली गेली का? असा मुद्दा उपस्थित केला जात आहे.
लैंगिक अत्याचारातून ‘त्या’ चिमुकलीच्या पोटात दुखू लागल्यानंतर या प्रकरणाचे बिंग फुटले. आईने विश्वासात घेऊन त्या चिमुरडीला विचारल्यानंतर वासनांध शिपाई फ्रान्सिस पिंटो या नराधमाची काळी कृत्ये बाहेर आली. पोलीस ठाण्यात रितसर गुन्हा दाखल झाला. गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर, तपास सुरु होताच या शाळेच्या प्राचार्यांनी बनवाबनवी सुरु केली. शाळेत असे काही घडलेच नाही, असं सांगण्याचा कांगावा केला. सहा महिन्यांच्या काळातील फुटेज उपलब्ध नसल्याचे प्राचार्य यांनी सांगण्याचा घाट घातला. शाळेचे प्रशासन प्रमुख म्हणून सगळी जबाबदारी प्रचार्यांवर येते, या प्रकरणाचे बालंट अंगलट येऊ नये, म्हणूनच प्राचार्यांनी बनवाबनवी आणि कांगावा केल्याचा बोलबाला शाळेचे कर्मचारी, पालक यांच्यामध्ये आहे.
सीसीटीव्ही फुटेजबद्दल माहिती देणे टाळले
ज्या प्रसिद्ध शाळेत लैंगिक शोषणाचा भयावह प्रकार घडला, त्या शाळेतील फुटेजसंदर्भात या प्रकरणाच्या तपासाशी संबंध असलेल्या पोलिसांना विचारण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी माहिती देणे टाळले. तपास सुरु आहे, इतकेच सहायक पोलीस आयुक्त यशवंत गवारी यांनी सांगितले.
कायदा अन् सुव्यवस्थेचं ठीक आहे, पण, ‘त्या’ चिमुरडीच्या न्यायाचे काय? वास्तविक बदलापूर घटनेचीच पुनरावृत्ती सोलापुरात घडल्याचा गंभीर प्रकार आहे. वासनांध शिपायाने सहा महिने पाच वर्षाच्या बालिकेचे लैंगिक शोषण केले आहे. या संतापजक आणि चिड येणार्या घटनेवरुन सोलापुरातील कायदा अन् सुव्यवस्था बिघडू नये, या शहरात काही अप्रिय घडलं तर त्याचे बालंट आपल्यावर येऊ यासाठी हे प्रकरण पोलीस अत्यंत जोखमीने हाताळत असल्याचे दिसत आहे. पण माध्यमांना यासंबंधी काहीच माहिती दिली जात नाही, एवढं गंभीर प्रकरण गुंडळालं जाऊ नये, ही सुज्ञ सोलापूरकर आणि तमाम पालक यांची अपेक्षा आहे. शाळेचे नाव बदनाम होऊ नये, पोलिसांवर काय बालंट येऊ नये, हे सगळं एका बाजूला खरं आहे, पण लैंगिक अत्याचारातून जिला शारिरीक आणि मानसिक यातना होत आहेत, जी मनातून पूर्णपणे खचली ‘त्या’ चिमुरडीला न्याय हा मिळायलाच पाहिजे. नराधम शिपाई फ्रान्सिस पिंटो याला त्याने केलेल्या कृतीची अद्दल घडायलाच हवी.
प्राचार्यांकडून कर्मचार्यांना बंद दाराआड दमबाजी;
नोकरीवरुन काढण्याचा इशारा, योग्य जबाबासंबंधी ताकीद
घडल्या प्रकरणाचे बालंट अंगाशी येऊ नये, यासाठी या शाळेच्या प्राचार्यांनी जोरदार हालचाली सुरु ठेवल्या आहेत, ‘शाळेत लैंगिक अत्याचाराचे जे काही प्रकरण घडले त्यासंबंधी आपणास काहीच माहिती नाही’ असाच जबाब शाळेतील संबंधित कर्मचार्यांनी द्यावा, असा सज्जड दम प्राचार्यांनी कर्मचार्यांना आपल्या केबीनमध्ये बोलवून दिल्याची चर्चा शाळेच्या कर्मचार्यांमध्ये आहे. मी सांगेल त्याप्रमाणे पोलिसांना माहिती दिली नाही किंवा जबाब दिले नाहीत तर नोकरीवरुन काढून टाकू, अशी ताकीददेखील प्राचार्यांनी याप्रकरणी दिल्याचा बोलबाला शाळेतील कर्मचार्यांच्या वर्तुळात आहे.
—