सोलापूर, 7 मे (हिं.स.)।
न्यूरो फिजिशिअन डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणी आणखी एक ट्विस्ट समोर आला. या प्रकरणातील तपास अधिकार्यांना उद्देशून डॉ. शोनाली वळसंगकर आणि त्यांचे वडील डॉ. दिलीप जोशी यांनी लिहिलेले निवेदन सोशल मीडियावर व्हायरल झाले. विविध वृत्तपत्रे व सोशल मीडियाद्वारे होणारी मानहानी रोखण्याविषयी हे निवेदन आहे.मात्र, हे निवेदन ना कोणत्या अधिकृत लेटर पॅडवर आहे, ना त्याखाली केलेल्या स्वाक्षर्यांची पुष्टी होण्यासाठी शिक्का आहे. त्यामुळे या निवेदनाबाबत संभ्रमावस्था आहे. तर दुसर्या बाजूला हे निवेदन म्हणजे माध्यमांची गळचेपी करण्याचा प्रयत्न असल्याची शंका व्यक्त होत आहे.
आशय असा ः डॉक्टरांच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी सुरू असताना या प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न माध्यमे करत आहेत. त्यासाठी माझ्यासह वडील डॉ. दिलीप जोशी याच्या नावाचा, नात्याचा, फोटोंचा परवानगीशिवाय वापर करून कुठल्याही पुराव्याशिवाय खोटी बातमी पसरवत आहेत.