मिठी नदी गाळ उपसा घोटाळा प्रकरण
मुंबई, 06 जून (हिं.स.) : मुंबईतील मिठी नदीच्या गाळ उपसा घोटाळ्यातीलमनी लाँड्रिग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने आज, शुक्रवारी मुंबई आणि केरळमध्ये छापेमारी केली. यात बीएमसीला 65 कोटीं रुपयांचे नुकसान झाले असून त्याची पीएमएलए कायद्यांर्गत चौकशी सुरू आहे. याचप्रकरणी मुंबई आणि केरळच्या कोची येथे 15 हून अधिक ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या आहेत.
या छाप्यांमध्ये बॉलीवूड अभिनेता दिनो मोरिया, बीएमसीचे सहाय्यक अभियंता प्रशांत रामुगडे आणि अनेक कंत्राटदारांच्या घरांचा समावेश आहे. शिवसेना (उबाठा) नेते आदित्य ठाकरे यांचे जवळचे सहकारी अभिनेता दिनो मोरिया यांची यापूर्वी ईओडब्ल्यूने दोनदा चौकशी केली होती. ईडी आता बेकायदेशीर पैशाचा प्रवाह शोधण्यासाठी छाप्यांमध्ये जप्त केलेल्या आर्थिक कागदपत्रांची आणि इतर साहित्याची तपासणी करत आहे. मिठी नदीतील गाळ काढण्याच्या अनियमिततांची चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (ईओडब्ल्यू) दाखल केलेल्या एफआयआरमधून काही बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) अधिकाऱ्यांसह काही इतरांविरुद्ध ईडीचा खटला सुरू आहे.
मिठी नदी घोटाळ्यात सहभागी असलेल्या लोकांनी 65 कोटी रुपयांचे नुकसान केले आहे. या घोटाळ्यात सहभागी असल्याच्या आरोपाखाली ईओडब्ल्यूने महापालिका अधिकारी आणि कंत्राटदारांसह 13 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही नदी शहरातून वाहत जाऊन अरबी समुद्राला मिळते. काही पुरवठादारांना फायदा व्हावा यासाठी विशेष ड्रेजिंग उपकरणे भाड्याने घेण्यासाठीच्या निविदांमध्ये फेरफार करण्यात आल्याचा आरोप आहे.