तिरुवनंतपुरम, 22 जुलै – मागील ३८ दिवसांपासून तांत्रिक बिघाडामुळे केरळच्या तिरुवनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर अडकून पडलेले ब्रिटनच्या रॉयल नेव्हीचे अत्याधुनिक एफ-35बी लाइटनिंग लढाऊ विमान अखेर दुरुस्तीनंतर मंगळवारी (दि. २२) सकाळी ब्रिटनच्या दिशेने यशस्वी उड्डाण केले.
१४ जून रोजी तांत्रिक अडचणीमुळे या विमानाने आपत्कालीन लँडिंग केले होते. त्यानंतर विमानाची दुरुस्ती सुरू होती. ब्रिटनमधून इंजिनिअरिंग पथक ६ जुलै रोजी भारतात दाखल झाले होते. अखेर, सखोल तपासणी आणि दुरुस्तीच्या प्रक्रियेनंतर आज सकाळी १०.५० वाजता या विमानाने उड्डाण केले.
एफ-35बी लाइटनिंग हे जगातील सर्वात प्रगत स्टेल्थ लढाऊ विमानांपैकी एक असून, ते ब्रिटनच्या अत्याधुनिक लढाऊ ताफ्याचा महत्त्वाचा भाग आहे. या विमानाची किंमत ११० दशलक्ष अमेरिकी डॉलर्सपेक्षा जास्त आहे. सोमवारी विमानाला हँगरमधून बाहेर काढून रनवेवर हलवण्यात आले होते.
दुरुस्ती दरम्यान काही दिवसांपूर्वी चर्चा होती की, हे विमान सुटे करून ब्रिटनला परत नेले जाईल. मात्र, दुरुस्ती यशस्वी झाल्यामुळे विमान जसेच्या तसे उड्डाणासाठी सज्ज झाले.
या यशस्वी दुरुस्तीनंतर ब्रिटिश उच्चायोगाने भारताचे आभार मानले आहेत. उच्चायोगाच्या प्रवक्त्याने म्हटले की,
“एफ-३५बीने आज भारतातून यशस्वी उड्डाण केले. आमच्या अभियांत्रिकी पथकाने सुरक्षा आणि तांत्रिक दुरुस्ती पूर्ण केली. भारत सरकार आणि अधिकाऱ्यांच्या सहकार्याबद्दल आम्ही अत्यंत आभारी आहोत. भारतासोबतची आमची संरक्षण भागीदारी अधिक दृढ होईल याची आम्हाला खात्री आहे.“
ही घटना केवळ एक दुरुस्ती नसून, भारत-ब्रिटन यांच्यातील संरक्षण सहकार्याच्या दृढ संबंधांचे प्रतिक ठरली आहे.
