अध्यक्षांवर 63 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप
बंगळुरू, 10 एप्रिल (हिं.स.) : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) कर्नाटक सहकारी बँकेच्या माजी अध्यक्षांना 63 कोटी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी अटक केली आहे. आर. एम. मंजुनाथ गौडा असे त्यांचे नाव असून त्यांना पीएमएलए कायद्यांतर्गत अटक करण्यात आली आहे. दरम्यान विशेष न्यायालयाने गौडा यांना 14 दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे.
शिमोगा जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेत (शहर शाखा) मोठ्या प्रमाणात निधीचा गैरवापर झाल्याचा आरोप ईडीने केला आहे, जो प्रामुख्याने गौडा यांच्या सूचनेनुसार शाखा व्यवस्थापक बी शोभा यांनी केला होता. कर्नाटक पोलिसांच्या लोकायुक्त पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार, ईडीने म्हटले आहे की, शोभा यांनी इतर सह-आरोपींसोबत कट रचून 62.77 कोटी रुपये हस्तांतरित केले. या पद्धतीमध्ये वैयक्तिक खातेधारकांच्या माहितीशिवाय बनावट सुवर्ण कर्ज खाती उघडणे आणि बनावट कागदपत्रे वापरणे समाविष्ट होते. भ्रष्टाचाराच्या पैशाचा वापर करून गौडा यांनी अनेक जंगम आणि स्थावर मालमत्ता मिळवल्याचे ईडीने म्हंटले आहे.