अकोला, ३० जुलै – “आयुष्यात कधीही भारतीय जनता पक्षासोबत जाणार नाही. उलट भाजपला संपवण्याचा आमचा प्रयत्न असेल,” अशी ठाम भूमिका राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी मांडली. ते अकोल्यात पक्षाच्या संघटनात्मक बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत होते.
भाजपसोबत का गेलो होतो – जानकरांचं स्पष्टीकरण
जानकर म्हणाले, “आधी काँग्रेसला मस्ती होती, म्हणून आम्ही भाजपसोबत गेलो होतो. मात्र आता भाजपच उद्दाम झाला आहे.” यापुढे त्यांच्या पक्षाचा भाजपसोबत कोणताही संबंध नसेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
महाविकास आघाडीकडे सकारात्मक भूमिका, पण लढाई स्वबळावर
समाजवादी पक्ष आगामी निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, “महाविकास आघाडीकडून जागा मिळाल्यास सहकार्य करण्यास आम्ही तयार आहोत,” असंही ते म्हणाले. सध्याच्या सरकारला पुन्हा सत्तेत येऊ न देता वैकल्पिक नेतृत्व घडवण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही जानकर यांनी नमूद केले.
वंचित बहुजन आघाडीलाही टोला
पक्ष संघटनबांधणीबाबत बोलताना जानकरांनी वंचित बहुजन आघाडीवरही निशाणा साधला. तसेच, “या सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांपासून इतर सर्वच पातळ्यांवर व्यभिचार आहे,” अशी तीव्र टीकाही केली.