नवी दिल्ली , 29 एप्रिल (हिं.स.) : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढत चालला आहे. त्याचबरोबर, पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारत कोणतीही कसर सोडत नाहीये. या संदर्भात भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकिस्तानला जोरदार सुनावलं आणि त्याच्या कृत्यांची तीव्र शब्दांत निंदा केली.
भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये म्हटलं की, पाकिस्तानचे संरक्षण मंत्री यांनी दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणे आणि त्यांना आर्थिक मदत पुरवण्याची कबुली दिली आहे. नाव न घेता भारताने आपल्या भाषणात म्हटले की, हे दुर्दैवी आहे की एका विशेष प्रतिनिधीमंडळाने या मंचाचा गैरवापर करण्याचा, त्याला कमजोर करण्याचा, खोटा प्रचार करण्याचा आणि भारतावर निराधार आरोप लावण्याचा मार्ग निवडला आहे.पुढे भारताने सांगितलं की, संपूर्ण जगाने अलीकडेच एका टेलिव्हिजन मुलाखतीमध्ये पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांना दहशतवादी संघटनांना पाठिंबा, प्रशिक्षण आणि आर्थिक मदत पुरवण्याच्या पाकिस्तानच्या इतिहासाची कबुली देताना ऐकले आहे. ही उघड कबुली कोणालाही आश्चर्यचकित करत नाही आणि पाकिस्तानला जागतिक दहशतवादाला प्रोत्साहन देणारा व संपूर्ण क्षेत्र अस्थिर करणारा एक दुष्ट राष्ट्र म्हणून उघड करत आहे. भारताच्या उप-स्थायी प्रतिनिधी यशस्वीनी पटेल यांनी सांगितले की, आता जग डोळे झाकून बसू शकत नाही.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव अधिकच वाढत चालला आहे. या दरम्यान भारत जागतिक पातळीवर समर्थन मिळवण्यासाठी सक्रियपणे प्रयत्न करत आहे. ही हालचाल परिस्थिती शांत करण्यासाठी नाही, तर संभाव्य लष्करी कारवाईसाठी आपला न्यायसंगत आधार मजबूत करण्यासाठी आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या क्रूर हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक डझनहून अधिक जागतिक नेत्यांशी संवाद साधला आहे. या दरम्यान, 100 परदेशी मिशनमध्ये तैनात असलेल्या राजनयिकांना तात्काळ परराष्ट्र मंत्रालयात बोलावण्यात आले आहे. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, भारत आपल्या शेजारी आणि कट्टर शत्रू देशाविरुद्ध लष्करी कारवाईसाठी तयारी करत आहे. पाकिस्तानचे नाव न घेता पंतप्रधान मोदी यांनी दोषींना कठोर शिक्षा देण्याचा आणि दहशतीच्या सुरक्षित ठिकाणांचा नाश करण्याचा संकल्प व्यक्त केला आहे.