श्रीनगर, 29 मे (हिं.स.) : जम्मू आणि काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात लष्कर-ए-तोयबाच्या दोन हायब्रिड दहशतवाद्यांनी आज, गुरूवारी आत्मसमर्पण केले. इरफान बशीर आणि उजैर सलाम अशी त्यांची नावे आहेत या दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलांनी मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे.
यासंदर्भात माहिती देताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, गोपनीय माहितीच्या आधारे बुधवारी रात्री सुरक्षा दलांनी बास्कुचन भागात घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली. यावेळी जवळच्या बागेत दहशतवादी हालचाली दिसून आल्या. त्यानंतर सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला. स्वतःला वेढा पडलेला पाहून, लश्कर-ए-तोयबाच्या 2 हायब्रिड दहशतवाद्यांनी आत्मसमर्पण केले. इरफान बशीर आणि उजैर सलाम अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून दोन एके-56 रायफल, 4 मॅगझिन, 102 राउंड (7.62×39 मिमी), 2 हँडग्रेनेड, 2 पाउच इत्यादी साहित्य जप्त करण्यात आले आहे.