मुंबई, २५ जुलै – राज्यात मराठी भाषेच्या मुद्द्यावर तापलेल्या वातावरणात अभिनेत्री केतकी चितळे हिने पुन्हा एकदा वादग्रस्त विधान करून चर्चेचे वळण आणले आहे. “जर कोणी मराठीत बोललं नाही, तर भाषेला भोकं पडणार आहेत का?” असा सवाल तिने सोशल मीडियावर केलेल्या व्हिडीओद्वारे उपस्थित केला आहे. या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर प्रसारित केलेल्या व्हिडीओमध्ये केतकी म्हणते, “मराठी न बोलण्यामुळे भाषेचे नुकसान होतं का? तुम्ही जर ‘मराठीत का बोलत नाहीस’, ‘मराठी येत नाही का?’ असे विचारता, तर ती असुरक्षिततेची लक्षणं आहेत. कोणाच्या मराठीत न बोलण्यामुळे कोणाच्या आयुष्यात काही फरक पडत नाही.”
इतक्यावरच न थांबता, केतकी चितळे हिने शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या कुटुंबावरही निशाणा साधला. “बाळासाहेबांचे नातू मिशनरी शाळेत शिकतात, जिथं पसायदान होत नाही, ते चालतं. पण आम्ही मराठीत बोललो नाही तर तुम्हाला त्रास होतो,” असे म्हणत तिने ठाकरे कुटुंबियांवर अप्रत्यक्षपणे टीका केली.
केतकीने २०२४ मध्ये मराठीसह बंगाली व आसामी भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी ठरवण्यात आलेल्या निकषांवरही आक्षेप घेतला. “अभिजात दर्जा ही असुरक्षिततेतून आलेली इच्छा आहे. हिंदी आणि उर्दू भाषांना अजून हा दर्जा मिळालेला नाही आणि कोणी त्यासाठी आंदोलनही करत नाही. त्यामुळे अशा दर्ज्याने काहीच बदलत नाही, उलट असुरक्षितता वाढते,” असे तिचे मत आहे.
अलीकडेच मुंबई आणि उपनगरांमध्ये मराठी न बोलणाऱ्या परप्रांतीय नागरिकांवर झालेल्या हल्ल्याच्या घटनांनी वातावरण आधीच तापलेले आहे. अशातच केतकी चितळे हिने केलेले विधान मराठी विरुद्ध अमराठी वादाला आणखी चिघळवणारे ठरू शकते, असे राजकीय व सामाजिक वर्तुळात बोलले जात आहे.