कोल्हापूर, २१ ऑगस्ट: कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पंचगंगा नदीला महापूर आल्याने धोक्याची पातळी गाठली आहे. राजाराम बंधाऱ्यावर नदीची पातळी ४३ फूट झाल्याने शहरातील अनेक भागात पाणी शिरले असून, रस्ते बंद झाले आहेत. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी करून आपत्कालीन यंत्रणा सक्रिय केली असून, नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर सुरू झाले आहे.
रात्री ११ वाजता जिल्हाधिकाऱ्यांनी कोल्हापूर शहर, कोल्हापूर-पन्हाळा महामार्ग तसेच आंबेवाडी आणि चिखली गावांमध्ये पाहणी करून पूरग्रस्त नागरिकांशी संवाद साधला. पाण्याची पातळी वाढत असल्याने त्यांनी लवकर स्थलांतर करण्याचे आवाहन केले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे अधिकारी, कर्मचारी आणि स्वयंसेवक रात्रभर बचाव कार्यात सहभागी झाले.
सुतारवाडा परिसरात पाणी शिरल्यामुळे ९ कुटुंबातील ३५ व्यक्तींना चित्रदुर्ग मठातील निवारा केंद्रात हलवण्यात आले. तसेच, आणूर बस्तवडे रस्त्यावर पुराच्या पाण्यात अडकलेल्या ट्रक चालक आणि क्लिनरची जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाने यशस्वीरित्या सुटका केली.
करवीर तालुक्यातील चिखली येथे स्थलांतराचे काम सुरू असल्याचे तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी सांगितले. गगनबावडा मार्गावरील पाणी कमी झाल्याने तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे, तर शिये-बावडा मार्गावरील वाहतूक कावळा नाका आणि शिरोलीमार्गे वळवण्यात आली आहे.
या संकटकाळात प्रशासनाच्या विविध विभागांनी समन्वयाने काम करून नागरिकांना मदत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे.