चंदीगड, 30 मे, (हिं.स.)। पंजाबमधील मुक्तसर जिल्ह्यातील सिंघेवाला गावात फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट झाला. यामध्ये आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण ढिगाऱ्याखाली दबले आहेत. ही घटना गुरुवारी (दि.२९) रात्री १२:३० वाजता घडली.
एका कामगाराने दिलेल्या माहितीनुसार, रात्री झोपेत असताना कारखान्यात आग लागल्याने एकच गोंधळ उडाला. काहीही समजण्यापूर्वीच मोठा स्फोट झाला आणि काही क्षणातच संपूर्ण इमारत ढिगाऱ्यात रूपांतरित झाली. १५ कामगार कसेबसे बाहेर पडण्यात यशस्वी झाले, तर २५ जण ढिगाऱ्याखाली दबले गेले. घटनेच्या वेळी कारखान्यात सुमारे ४० कामगार काम करत होते. बहुतेक कर्मचारी उत्तर प्रदेश आणि बिहारचे असल्याचे सांगितले जात आहे.
डीएसपी जसपाल सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा कारखाना सिंगे वाला-फुतुहिवाला येथील तरसेम सिंह नावाच्या व्यक्तीचा आहे. या दुर्घटनेत आतापर्यत ५ जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना भटिंडा एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ढिगाऱ्याखालून 3 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. चौकशीनंतर पुढील कारवाई केली जाईल.
या घटनेनंतर पोलीस, अग्निशमन दल आणि मदत पथके घटनास्थळी पोहोचली असून ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. घटनास्थळी मोठ्या संख्येने स्थानिक लोकही मदत करत आहेत. स्फोटाचे नेमके कारणं अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, प्रशासनाने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. जर सुरक्षिततेच्या निकषांकडे दुर्लक्ष केलं गेलं असेल तर कारखाना मालक आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असं पोलिसांनी म्हटलं आहे.
या कारखान्यात फटाके बनवण्याचे काम उत्तर प्रदेशातील हाथरस येथील रहिवासी कंत्राटदार राज कुमार याने घेतल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेनंतर कंत्राटदार फरार आहे, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.