जालना , 30 एप्रिल (हिं.स.)।मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आता मराठा आरक्षणासाठी थेट मुंबईत धडकणार असल्याची घोषणा केली आहे. आगामी २८ ऑगस्ट पर्यंत त्यांच्या ८ ते ९ प्रमुख मागण्या मान्य न केल्यास २९ ऑगस्ट रोजी मुंबईत जाऊन उपोषण करणार असून आता मुंबईतून विजयी यात्रा निघेल अथवा अंत्ययात्रा निघेल असे जरांगे पाटील यांनी म्हटले.यासोबतच, अंतरवाली सराटीत चालू असलेले उपोषणही कायम राहणार आहे.
जालनामधील अंतरवाली सराटीमध्ये आज(दि.३०) मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी पुढील आंदोलनाची घोषणा केली. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना जरांगे पाटील म्हटले की, “मी मुंबईला जाताना विजयाचा आणि अंत्ययात्रेचा असे दोन रथ घेऊन जाणार आहे. हे केवळ आंदोलन नाही, तर मराठा समाजाच्या आत्मसन्मानाची लढाई आहे.” जरांगे पाटील यांनी सरकारकडे मागणी केली की, “मराठा आणि कुणबी एकच आहेत” असा आद्यादेश तातडीने काढावा. 58 लाख नोंदींचे पुरावे देऊनही आरक्षणाचा कायदा केला गेलेला नाही.
मागील दोन वर्षांपासून संयम पाळला जात आहे. अनेक मागण्या प्रलंबित असून संबंधित अधिकाऱ्यांचा जातीय दृष्टिकोन आड येतोय, असा आरोप त्यांनी केला. पुढे ते म्हणाले की, “28 ऑगस्टनंतर जर मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर माझ्या मराठा बांधवांसोबत मी मुंबईत उतरणार आणि तेथे आमरण उपोषण करणार आहे. मात्र, आंदोलन शांततेतच होईल. कुणालाही धक्का लागू नये, ही माझी अपेक्षा आहे,” असे जरांगे यांनी शेवटी स्पष्ट केले.
मनोज जरांगे यांनी आपल्या उपोषणाची घोषणा केल्यानंतर त्यांनी आपल्यासोबत येणाऱ्या मराठा आंदोलकांनी 20 ते 25 दिवसांची तयारी करुन यावं असे आवाहन केले. आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी आता शांत बसून चालणार नाही असेही त्यांनी म्हटले. पुढे जरांगे यांनी म्हटले की, आता ऊन जास्त आहे शेतीत कामे सुरू आहेत. जूनमध्ये पेरण्या पूर्ण होतील. सर्व कामे आटोपून मुंबईला जायचे आहे. सगळ्यांनी कामं उरकायला सुरुवात करा, असे आवाहन केले. 1 ऑगस्ट रोजी आंदोलनाची पुढील दिशा सांगणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.