फरीदाबाद, 22 जुलै – हरियाणाच्या फरीदाबाद शहरात आज (मंगळवार) सकाळी सौम्य भूकंपाचे झटके जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.2 इतकी नोंदवण्यात आली असून कोणतीही जीवित वा वित्तहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. हे झटके मुख्यतः उंच इमारतींच्या वरच्या मजल्यांवर जाणवले.
राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्र (NCS) ने सोशल मीडियावरून दिलेल्या माहितीनुसार, हा भूकंप 22 जुलै 2025 रोजी सकाळी 6 वाजता झाला. त्याचा केंद्रबिंदू फरीदाबादमध्ये असून तो जमिनीखाली 5 किलोमीटर खोल होता. सध्या दिल्ली-एनसीआर परिसरात भूकंपाच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे निरीक्षण आहे.
याआधी गेल्या आठवड्यात हरियाणातील झज्जर जिल्ह्यात 2.5 तीव्रतेचा भूकंप झाला होता. त्याची खोलीही 5 किलोमीटर इतकी होती. त्याचा केंद्रबिंदू 28.64 अंश उत्तर अक्षांश आणि 76.75 अंश पूर्व रेखांशावर नोंदवण्यात आला. याच झज्जर परिसरात 10 आणि 11 जुलै रोजी अनुक्रमे 4.4 आणि 3.7 तीव्रतेचे भूकंप झाले होते. त्याचे झटके दिल्ली, नोएडा, गुरुग्राम, रोहतक आणि एनसीआरच्या इतर भागांपर्यंत जाणवले.
या सर्व घटनांमध्ये कोणतीही गंभीर हानी झालेली नसली तरी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भूकंप शास्त्रज्ञांच्या मते, पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली सात प्रमुख व अनेक लहान टेक्टोनिक प्लेट्स असतात. या प्लेट्स सतत हालचाल करत असतात आणि कधी कधी एकमेकांवर आदळतात. या आदळण्यामुळे त्यांच्यात दडपण तयार होते आणि जेव्हा त्या तुटतात, तेव्हा निर्माण होणारी ऊर्जा जमिनीच्या आतून बाहेर येते आणि भूकंप होतो.
विशेषतः दिल्ली-एनसीआर भाग भूगर्भीय दृष्टिकोनातून संवेदनशील असल्याने अशा सौम्य भूकंपांच्या घटनांची शक्यता कायम राहते. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आणि आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
