पुणे, 13 एप्रिल (हिं.स.)। छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यांचे प्रतिक म्हणून त्यांच्या गड किल्ल्यांकडे पाहिले जाते. पुण्यातील सिंहगड किल्ला हे त्याचे जाज्वल्य उदाहण आहे. हा किल्ला नरवीर तानाजी मालुसरेंच्या बलिदानाचे जीवंत स्मारक असलेला किल्ला आहे. या किल्लावर काही तरुणांनी एका परदेशी पाहुण्यासोबत असभ्य वर्तन करुन त्याला मराठीतून शिव्या देण्यास भाग पाडल्याचा संतापजनक प्रकार घडला. यानंतर संबंधित प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या संतापजनक प्रकारामुळे संतापाची लाट उसळून आली होती. या प्रकरणी पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारत अखेर टवाळखोरांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यूझीलंड येथील एक पर्यटक सिंहगड किल्ल्यावर ट्रेकसाठी गेला होता. त्यावेळी संभाजीनगर येथील आठ ते दहा तरुणांचा ग्रृपही ट्रेक करत होता. या ट्रेकदरम्यान ग्रृपमधील चार तरुणांनी परदेशी पाहुण्यासोबत गप्पा मारल्या. त्यानंतर तरुणांनी मराठीत परदेशी पाहुण्याला मराठीत शिव्या देण्यास भाग पाडलं. यानंतर या चीड आणणाऱ्या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामुळे गडकिल्ले प्रेमी यांनी याबाबत नाराजी व्यक्त करत संबंधित तरुणांवर कारवाई करण्याची मागणी केली होती.