मुंबई, 1 जुलै (हिं.स.)।महायुती सरकारने त्रिभाषा धोरणाचा शासकीय निर्णय रद्द केला आहे. या पार्श्वभूमीवर 5 जुलैला ठाकरेंची शिवसेना आणि मनसे विजयी मेळावा घेणार आहेत.हा मेळावा वरळी डोम येथे होणार आहे. या मेळाव्यावरून आता संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी आणि एकनाथ शिंदेंना डिवचलंय.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक्सवर या मेळाव्याची पोस्ट केलीय. त्यांनी या विजयी मेळाव्याचं निमंत्रण पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक्सवर टॅग करत दिलंय. संजय राऊत यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या विजयी मेळाव्याचं पत्रक शेअर केलंय. यामध्ये त्यांनी पंतप्रधान मोदी आणि एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्राचे शत्रू म्हटलंय.महाराष्ट्राच्या शत्रूंना आणि मराठीच्या मारेकऱ्यांना आव्हान आणि आवाज देणारी घडामोड. यावे जागराला यावे, असंही संजय राऊतांनी पोस्टद्वारे म्हटलं आहे. तसेच या पत्रकाद्वारे त्यांनी नागरिकांना वाजत-गाजत येण्याचं आवाहन केलंय.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एक पत्रक काढत सर्वांना आवाहन केलंय.या पत्रकामध्ये आवाज मराठीचा, असं म्हणत मराठी मातांनो, भगिनींनो आणि बांधवांनो, सरकारला नमवलं का? तर हो नमवलं, कोणी नमवलं तर ते तुम्ही, मराठी जनांनी नमवलं. आम्ही फक्त तुमच्या वतीने संघर्ष करत होतो. त्यामुळे हा आनंद साजरा करतानासुद्धा, आम्ही फक्त या मेळाव्याचे आयोजक आहोत, बाकी जल्लोष तुम्ही करायचा आहे. वाजत गाजत या, जल्लोषात, गुलाल उधळत या…
दरम्यान, ठाकरे बंधूंचा हा विजयी मेळावा ५ जुलै रोजी सकाळी १० वाजता होणार आहे. हा मेळावा वरळी डोम येथे होणार आहे. या मेळाव्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्याची जोरदार मोर्चेबांधणी सुरू झालीय.या मेळाव्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्रासह लक्ष लागलंय.