मुंबई, २७ मे (हिं.स.) : राज्यात मान्सूनचं आगमन झालं असून हवामान विभागाने पुढील ६ ते ७ दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. महाराष्ट्रातील काही भागांमध्ये रेड अलर्ट, तर काही ठिकाणी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, तसेच केरळ, कर्नाटक आणि गोव्यातही जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुंबईत कालपासून रिमझिम पावसाची नोंद झाली असून समुद्रात चार ते पाच मीटर उंच लाटा उसळल्याचं पाहायला मिळालं आहे. आज सकाळपासून ओहोटीमुळे समुद्राचे पाणी मागे सरकलं आहे.
दरम्यान, जळगावमध्ये आज पहाटेपासूनच मुसळधार पाऊस सुरु आहे. विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून फळबागांचे नुकसान आणि मशागतीचे काम लांबणीवर पडले आहे. गोंदिया जिल्ह्यातही मान्सूनची दमदार हजेरी लागली आहे.
रत्नागिरीत पावसामुळे प्रमुख नद्या पाणीदार झाल्या असून टंचाईग्रस्त गावांना मोठा दिलासा मिळाला आहे. पावसामुळे विहिरी व तलाव भरले असून टँकरवरील अवलंबित्व कमी होण्याची शक्यता आहे.
जालना जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे ४७ गावांना पुराचा धोका असून आपत्ती व्यवस्थापन विभाग सतर्क झाला आहे. नागरिकांना ‘दामिनी’ ॲप वापरण्याचे आणि आपत्कालीन टोल फ्री क्रमांक १०७७ वर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मे महिन्यात पूर्वमोसमी पावसामुळे राज्यात तब्बल २५४ झाडे कोसळली असून एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे. महापालिकेच्या विकासकामांमुळे झाडांची मुळे कमकुवत होऊन हे प्रकार घडल्याची चर्चा आहे.