पुणे, 04 जुलै (हिं.स.) : लोकमान्य टिळकांनी पुण्यातून स्वातंत्र्यासाठी एल्गार पुकारला होता. तर 17 व्या शतकात देखील पुण्यात स्वातंत्र्याचा हुंकार निनादला होता. पुणे हे स्वराज्याचे उमगस्थान असून अनेकांना प्रेरणा देणाऱ्या थोरल्या बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्यासाठी एनडीएचीच जागा योग्य असल्याचे प्रतिपादन केंद्रय गृहमंत्री अमित शाह यांनी केले. पुण्याच्या खडकवासला येथील एनडीए परिसरात आज, शुक्रवारी बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याचे अनावरण केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय हवाई मंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार मेधा कुलकर्णी आदी उपस्थित होते.
याप्रसंगी शाह म्हणाले की, बाजीराव यांच्या पुतळ्यापासून अनेकांना प्रेरणा मिळेल. काही युद्धनीती कालबाह्य होत नाहीत. सध्याची युद्धनीती आणि बाजीरावांची युद्धनीती यामध्ये साम्य आहे. बाजीरावांनी 20 वर्षांत 41 लढाया लढून त्या सर्व जिंकल्या. पराभव निश्चित मानल्या जाणाऱ्या लढाया बाजीरावांनी जिंकल्या. त्यामुळे त्यांच्यासारखा अजिंक्य सेनापती दुसरा नाही. त्यांचे संपूर्ण आयुष्य लढाया लढण्यात गेले. त्यांनी मिळविलेला विजय कल्पने पलिकडचा होता.मराठा साम्राज्याचे तुकडे झाले तरी, पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेण्याचे महत्त्वाचे काम केले. त्यांनी शेजारच्या संस्थांनातही प्रशासन उत्तम राबविले. छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची कल्पना केली, तेव्हा भूगोल वेगळा होता. शिवरायांच्या वारसांनी स्वराज्याची ज्योत विझू दिली नाही. शिवरायांनंतर संभाजी महाराज, ताराराणी यांनी परंपरा पुढे नेली. बुंदेलखंड, तंजावर, गुजरातपासून अफगाणिस्तान, अटक, कटकपर्यंत स्वराजाचा विस्तार केला. निजामविरोधातील पालखेडचा मराठ्यांचा विजय अविस्मरणीय आहे. मी जेव्हा निराश होतो. तेव्हा छत्रपती शिवराय आणि बाजीरावांचा इतिहास आठवतो. बाजीरावांचे वर्णन करायला माझ्याकडे शब्द नाहीत. बाजीरावांकडे एक शिपाई आणि तीन घोडे होते असा उल्लेख त्यांनी केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, थोरले बाजीराव पेशवे यांची लढाई जिंकण्यामध्ये एक विशेष रणनिती होती. त्यांचा सेना एका दिवसामध्ये 8 ते 10 किलोमीटर प्रवास करायची. अशा प्रकारची सेना तयार करून त्यांनी आपले युद्ध कौशल्य सिद्ध केले होते. परंतु इंग्रजांनी आणि त्यानंतर काही प्रमाणात स्वकीयांनी इतिहासातील नायकांवर अन्याय केला. किंबहुना आपल्या हिंदवी स्वराज्य आणि मराठ्यांचा इतिहास डिलिट करून टाकला. मुघलानंतर इंग्रज आले. त्यामुळे आपल्य़ा अनेक महानायकांचा विसर पडला. परंतु आज देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली इतिहासातील अनेक नायकांचा, योद्ध्यांचा, स्वातंत्र्यसेनानींचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम केले जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.