अमरावती, 8 एप्रिल (हिं.स.)काही मंडळी धर्माच्या नावावर राजकारण करून आपली राजकीय पोळी शेकून घेत आहे, एखादे वेळी हे ठिक आहे. मात्र देशातील सहिष्णु जनता फार काळ हे सहन करणार नाही, सर्वधर्म समभाव तोडणाऱ्यांना देशातील जनता जागा दाखवेल, असा इशारा माजी मंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांनी विरोधकांना दिला आहे.
श्रीराम नवमीच्या पावन पर्वावर तिक्सा तालुक्यातील मोझरी येथील जवळपास सातशे वर्ष पुरातन श्रीराम मंदिरात अॅड. यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीत राम जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. या पुरातन मंदिरावर नेत्रदीपक रोषणाई करण्यात आली होती. शिवाय फटाक्यांची आतषबाजी, रामनामाचा गजर सर्वांचे लक्ष वेधून घेणारा होता. ग्रामस्थ मोठ्या संख्येने या महोत्सवात सहभागी झाले होते. अॅड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी जय श्रीरामाच्या घोषणांनी संपूर्ण परिसर निनादून गेला होता. शिवाय गावातून काढण्यात आलेल्या शोभायात्रेत मोठ्या संख्येने गावकरी सहभागी झाले होते.
काही मुस्लिम बांधवांनी सुद्धा या महोत्सवाला उपस्थिती दर्शवून सर्वधर्म समभावाच्या भावनेची जपणूक केली.
आम्ही काँग्रेसचे आणि हिंदू धर्माचे सुद्धा
आम्ही पिढ्यानपिढ्या श्रीरामाला माननारे अहोत, हा देश सर्वधर्मसमभाव मानणा-यांचा देश आहे. आणि या सर्वधर्मसमभावाला कुणी तडा देत असेल तर या देशातील नागरिक त्यांना कधीही माफ करणार नाहीत. आम्ही काँग्रेसचे आहोत आणि हिंदु धर्माचे सुद्धा, आमची संस्कृती कधीच कुण्या धर्माचा द्वेष करायला शिकवित नाही, राजकारण नसले तरी चालेल मात्र आम्ही सर्वधर्मांचा सन्मान करत राहू, असेही अॅड. यशोमती ठाकूर म्हणाल्या.