चंदीगड , 9 एप्रिल (हिं.स.)।इंडियन प्रीमियर लीग २०२५ च्या २२ व्या सामन्यात युवा सलामीवीर प्रियांश आर्य याने धमाकेदार शतकी खेळीसह इतिहास रचला. पंजाब किंग्जच्या डावाची सुरुवात करताना त्याने चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध शतकी खेळी केली.सनरायझर्स हैदराबादच्या इशान किशननंतर यंदाच्या हंगामात शतकी खेळी करणारा तो दुसरा फलंदाज ठरला आहे.
पंजाबचे घरचे मैदान असलेल्या मुल्लानपूर येथील महाराजा यादविंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध पहिल्यांदा फलंदाजी करताना पंजाबची सुरुवात खराब झाली. पण ठराविक अंतराने विकेट पडत असतानाही प्रियांश आपल्या आक्रमक अंदाजात खेळला. १९ चेंडूत अर्धशतक साजरे करणाऱ्या प्रियांशनं पुढच्या २० चेंडूत शतक साजरे केले. ३९ चेंडूतील शतकासह तो आयपीएलच्या इतिहासात सर्वात जलद शतक झळकवणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. अनकॅप्ड खेळाडूंच्या यादीत सर्वात जलद शतकी खेळी करण्याचा विक्रम आता प्रियांशच्या नावे झाला आहे.
भारताकडून आयपीएलमध्ये सर्वात जलद शतकी खेळीचा विक्रम हा युसूफ पठाणच्या नावे आहे. त्याने ३७ चेंडूत आयपीएलमध्ये शतक झळकावले होते. प्रियांश आर्य हा पंजाब किंग्जच्या फ्रँयायझी संघाडून सर्वात जलद शतक झळकवणारा दुसरा फलंदाजही ठरलाय. याआधी २०१३ मध्ये डेविड मिलरनं या फ्रँचायाझी संघाकडून खेळताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध ३८ चेंडूत शतक झळकावले होते.
आयपीएलमध्ये सर्वात जलद शतक झळकवण्याचा विक्रम हा कॅरेबियन स्टार ख्रिस गेलच्या नावे आहे. त्याने २०१३ च्या हंगामात पुणे वॉरियर्स इंडिया संघाविरुद्ध ३० चेंडूत शतक पूर्ण केले होते. पदार्पणाच्या हंगामातच प्रियांश आर्य सर्वात जलदगतीने शतक साजरे करणाऱ्या एलिट क्लबमध्ये सामील झालाय. ३९ चेंडूत शतक झळकवणाऱ्या प्रियांश आर्यनं चेन्नई विरुद्धच्या सामन्यात ४२ चेंडूत ७ चौकार आणि ९ षटकाराच्या मदतीने १०३ धावांची दमदार खेळी केली.