मुंबई, 21 मे (हिं.स.)।राज्यभर अनेक ठिकाणी पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली असून मुंबई आणि पुण्यात थैमान घातले आहे.मुंबईतील अनेक ठिकाणी विजांच्या गडगडाटासह पाऊस झाला. मंगळवारी(दि.२०) दिवसभर आणि रात्रभर पावसामुळे पुणे शहर आणि उपनगरामध्ये जनजीवन विस्कळीत झाले. तर मुंबईत अरबी समुद्र खवळल्याने मच्छिमारांना पुढील ५ दिवस समुद्रात न जाण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
महाराष्ट्र आणि गोव्या जवळ अरबी समुद्रात 22 मे पासून कमी दाबाचा पट्टा तयार होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 24 मेपर्यंत तो अधिक तीव्र होऊन उत्तरेकडे सरकू शकतो. राज्याच्या किनाऱ्याला थेट धोका नसला तरी याचा परिणाम म्हणून समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता आहे.दरम्यान, पुढचे चार ते पाच दिवस राज्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. पूर्व मोसमी पावसाने मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात हजेरी लावली. मे महिन्याच झालेल्या दमदार पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे तर शेत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मंगळवारी(दि. २०) झालेल्या मुसळधार पावसामुळे पुण्यातील रस्त्यांना नदीचं स्वरूप प्राप्त झालं होतं. जोरदार पावसामुळे आलेल्या पाण्याच्या प्रवाहात अनेक गाड्या वाहून गेल्या. या पावसाचे पाणी काही घरांमध्येदेखील शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. पुणेकरांना वाहतुक कोंडीच्या मनस्तापालाही सामोरे जावे लागले.
—————