सांगली : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिरढोण (ता. कवठेमहांकाळ) येथे दशरथ पांडुरंग माळी (वय 26, रोपळे बुद्रुक, ता. पंढरपूर) व शिवकुमार किशोर शिंदे (वय 26, वाखरी, ता. पंढरपूर) या दोघांना अटक करून देशी बनावटीचे पिस्तुल, काडतुस आणि कुकरी जप्त केली. दोघांविरूद्ध कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस अधीक्षक सुहैल शर्मा व अप्पर अधीक्षक मनिषा दुबुले यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणला जिल्ह्यात पेट्रोलिंग करून जबरी चोरी, घरफोडी, अवैध शस्त्रे याबाबत कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी कारवाईसाठी खास पथक तयार केले आहे. गुरूवारी पथक जत विभागात पेट्रोलिंग करत होते. तसेच रेकॉर्डवरील काही आरोपींची तपासणी करत होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
तेव्हा पोलिस कर्मचारी सचिन कनप यांना शिरढोण येथील साईगणेश पान शॉपजवळ दोघे संशयित तरूण थांबले असून त्यांच्याजवळ पिस्तुल व कुकरी असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे उपनिरीक्षक प्रदीप चौधरी आणि पथक तत्काळ शिरढोण येथे आले. सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले.
चौकशीत दोघांनी दशरथ माळी व शिवकुमार शिंदे अशी नावे सांगितली. दोघांची झडती घेतली असता माळी याच्या कमरेला 75 हजार रूपयाचे देशी बनावटीचे पिस्तुल व काडतुस मिळाले. तसेच शिंदे याच्या कमरेला कुकरी मिळाली. दोघांकडून पिस्तुल, काडतुस, कुकरी आणि दुचाकी असा 1 लाख 26 हजाराचा मुद्देमाल जप्त केला.
ताब्यात घेतलेल्या दोघांना कवठेमहांकाळ पोलिसांच्या ताब्यात देऊन आर्म ऍक्टनुसार गुन्हा दाखल केला.
ही कारवाई पोलिस निरीक्षक पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक चौधरी, उपनिरीक्षक शरद माळी तसेच सचिन कुंभार, मच्छिंद्र बर्डे, सचिन कनप, मुदस्सर पाथरवट, संजय पाटील, राजाराम मुळे, सुनिल लोखंडे, आमसिद्ध खोत, अजय बेंदरे, उर्मिला खोत, निसार मुलाणी यांच्या पथकाने कारवाई केली.