अमरावती, 30 जुलै – “छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करत शिवराज्याभिषेक दिन साजरा केला नसता, तर आज आपण १५ ऑगस्ट व २६ जानेवारीसारखे राष्ट्रीय सण मुक्तपणे साजरे करू शकलो नसतो. त्यामुळे शिवराज्याभिषेक दिन हा देशातील सर्वात मोठा उत्सव मानला गेला पाहिजे,” असे मत शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी मांडले.
बडनेरा मार्गावरील जय भारत मंगलम येथे आयोजित स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. या भेटीची माहिती केवळ मोजक्या कार्यकर्त्यांपुरती ठेवण्यात आली होती. मंगळवारी भिडे गुरुजींनी आपल्या कार्यकर्त्यांशी जवळपास दीड तास सविस्तर चर्चा केली.
शिवराज्याभिषेक दिनाचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करताना भिडे म्हणाले, “हा दिवस म्हणजे देशाच्या आत्मसन्मानाचे प्रतीक आहे. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकामुळेच आपण आज स्वातंत्र्य आणि गणराज्यदिनाच्या दिवशी अभिमानाने झेंडा फडकवू शकतो.”
शिवप्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष निशादसिंह जोध यांनी सांगितले की, “या बैठकीत शिवराज्याभिषेक दिनाचे महत्त्व, युवकांचे राष्ट्राविषयी कर्तव्य, तसेच आगामी आंदोलन व संघटनात्मक कार्य या विषयांवरही मार्गदर्शन झाले.”
ही बैठक दुपारी ४.३० वाजेपर्यंत सुरू होती. त्यानंतर भिडे गुरुजी पुढील एका बैठकीसाठी कामरगाव येथे रवाना झाले.