वॉशिंग्टन, 29 जुलै – अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील मॅनहॅटन परिसरात एका बंदूकधाऱ्याने अचानक गोळीबार केल्याने किमान चार जणांचा मृत्यू झाला असून, यामध्ये एका पोलीस अधिकाऱ्याचाही समावेश आहे. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल हल्लेखोराला ठार केले असून, संपूर्ण परिसर बंद करण्यात आला आहे.
हल्ला व्यस्त व्यवसायिक भागात
गोळीबार पार्क अव्हेन्यू आणि ईस्ट ५१व्या स्ट्रीट भागात झाला. या भागात कोलगेट-पामोलिव्ह, केपीएमजी यांसारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांची मुख्य कार्यालये तसेच अनेक पंचतारांकित हॉटेल्स आहेत. गोळीबारानंतर स्थानिक पोलीस आणि विशेष पथक घटनास्थळी दाखल झाले आणि परिसर सील करण्यात आला.
महापौरांचा संताप, पोलीस अधिकाऱ्याबाबत शोक
न्यूयॉर्कचे महापौर एरिक अॅडम्स यांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर)वर प्रतिक्रिया देताना सांगितले की, “आपला एक अधिकारी या हिंसाचारात मरण पावला आहे. त्याच्या कुटुंबीयांबद्दल आम्हाला अत्यंत दु:ख आहे.”
नागरिकांना सतर्कतेचा इशारा
गोळीबार सुरू असताना महापौर अॅडम्स यांनी “मिडटाऊन परिसरात सध्या सशस्त्र हल्लेखोर सक्रिय आहे. जर तुम्ही पार्क अव्हेन्यू किंवा ईस्ट ५१व्या स्ट्रीट परिसरात असाल, तर कृपया सुरक्षित स्थळी राहा आणि बाहेर पडू नका,” असे आवाहन केले होते.
पोलीस विभागाने नंतर ट्वीट करून हल्लेखोर ठार झाल्याची माहिती दिली आणि परिसर नियंत्रणात घेतल्याचे स्पष्ट केले.