सोलापूर, 29 एप्रिल (हिं.स.)।
सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे पहिल्यांदाच पाच उमेदवार निवडून आले आहेत. पक्षाच्या आमदारांत फाटाफूट होऊनही भाजप ”प्लस”मध्ये राहिली आहे. तर भाजप आमदारांच्या मदतीने काँग्रेसने वर्चस्व राखले आहे.
बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेस नेत्यांना एकत्र आणून पॅनेल उभे केलेल्या भाजपचे जिल्हाध्यक्ष, आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या गटाचे सुनील कळके, अनिता विभूते हे दोघे तर ”कार्यकर्त्यांसाठी” त्यांच्या विरोधात शड्डू ठोकलेल्या आमदार सुभाष देशमुख यांच्या पॅनेलमधून त्यांचे पुत्र मनीष देशमुख, रामप्पा चिवडशेट्टी व अतुल गायकवाड हे तिघे असे भाजपचे पाचजण निवडून आले आहेत. बाजार समितीच्या मागील संचालक मंडळात आमदार विजयकुमार देशमुख हे भाजपचे एकमेव संचालक होते.
२० वर्षांपूर्वी राजेंद्र गंगदे व केदार विभूते हे दोन संचालक होते. मात्र, यावेळेस सर्वाधिक पाच संचालक निवडून आले आहेत. या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार दिलीप माने यांच्या पॅनेलने १३ जागा जिंकून सत्ता मिळवली असली तरी ग्रामपंचायत गटात आमदार सुभाष देशमुख यांची ताकद दिसून आली. आर्थिक दुर्बल घटक मतदारसंघात उमेदवार निवड त्यांना भोवली. अन्यथा चारही जागा मिळाल्या असत्या. गतवेळच्या पंचवार्षिक निवडणुकीत त्यांच्या पॅनेलला हार पत्करावी लागली होती.