सोलापूर, 3 एप्रिल (हिं.स.)।
पुणे ते कोइमतूर प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांच्या झोपेचा गैरफायदा घेऊन चोरट्याने मोबाईल चोरून नेला. प्रवाशाच्या बँकेच्या खात्यावरील १ लाख ४३ हजार रुपयांची रक्कम चोरट्याने काढून घेतली. मोबाईल चोरीची घटना एलटीटी सीबीई एक्स्प्रेस (११०१३) या गाडीमध्ये घडली.
फिर्यादी विवेक शिळवणे (रा. बारामती) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कुर्डुवाडी रेल्वे पोलिसात घटनेची नोंद झाली आहे. फिर्यादी कामगार बाबूराव जाधव यांच्यासह सदर गाडीच्या बोगी क्रमांक बी ४ मधून प्रवास करत होते. त्यांनी मोबाइल सीटच्या बाजूला चार्जिंगला लावला व झोपले. चोरट्याने झोपेचा गैरफायदा घेत मोबाईल लंपास केला.त्यांनी हे गाडीतील टिसी यांना सांगितले व कामानिमित्त पुढे कोइमतूरला गेले. तिथून पुण्याला परतत असताना फिर्यादीने त्यांच्या कंपनीच्या नावे खाते असलेल्या बँक खात्याचे विवरण काढून पाठवण्यास पत्नीला फोनवरून सांगितले. त्यांच्या पत्नीने सदर बँकचे विवरण पतीला पाठवल्यानंतर ते तपासले असता सदर खात्यावरून १ लाख ४३ हजार रक्कम काढून घेतलेले होते.