सोलापूर, 16 एप्रिल (हिं.स.)।
जिल्हा परिषदेच्या दोन हजार ७७७ शाळा असून, २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात त्या शाळांमध्ये एक लाख ८६ हजारांपर्यंत विद्यार्थी प्रवेशित होते. पण, २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात दोन लाखांपर्यंत पोचलेली पटसंख्या तीन वर्षांत १२ हजारांनी कमी झाली. त्यामुळे यंदा सुमारे ७०० शिक्षक अतिरिक्त होत आहेत. आगामी शैक्षणिक वर्षात अशी स्थिती निर्माण होऊ नये, यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांनी प्रत्येक शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षकांना सध्याच्या पटसंख्येत १० टक्के वाढ करण्याचे निर्देश दिले आहेत.
सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सध्या आठ हजार ९९० शिक्षक कार्यरत आहेत. ७०० शिक्षकांची पदे रिक्त आहेत, पण पटसंख्या कमी झाल्याने तेवढेच शिक्षक अतिरिक्त होत असल्याने या भरतीत सोलापूर जिल्हा परिषदेला एकही शिक्षक मिळणार नाही, अशी स्थिती आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांचा पट क्षमतेपेक्षा जास्त असल्याची उदाहरणे आहेत.
दुसरीकडे १४० पेक्षा जास्त शाळांची पटसंख्या २० देखील नाही, अशीही दुरवस्था आहे. अशा शाळा भविष्यात बंद होऊ नयेत, यासाठी शाळा व्यवस्थापन समित्यांनी देखील पटसंख्या वाढीसाठी शिक्षकांना मदत करावी लागणार आहे. आता मे महिन्यात शिक्षकांच्या बदल्या झाल्यावर त्या नवख्या शिक्षकांना नोकरी टिकविण्यासाठी पटसंख्या वाढवावी लागेल, अशीही स्थिती आहे.