नवी दिल्ली, 15 ऑक्टोबर। जलवायू कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना सध्या तरी सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही तात्पुरता दिलासा मिळाला नाही. सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली अंगमो यांनी त्यांच्या याचिकेत सुधारणा करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेवर पुढील सुनावणीसाठी २९ ऑक्टोबर ही तारीख निश्चित केली आहे.
न्यायालयाने सोनम वांगचुक यांना त्यांच्या पत्नी गीतांजलीसोबत त्यांच्या नजरकैदेसंदर्भातील काही नोंदी शेअर करण्याची परवानगी दिली आहे. लडाख प्रशासनाने यावर कोणतीही हरकत घेतलेली नाही.
या याचिकेमध्ये गीतांजली अंगमो यांनी सोनम वांगचुक यांना राष्ट्रीय सुरक्षा कायदा (एनएसए) अंतर्गत ताब्यात ठेवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला आव्हान दिले आहे. गीतांजली अंगमो यांच्यावतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी न्यायालयात म्हटले की, “आम्हाला याचिकेत सुधारणा करायची आहे, त्यामुळे थोडा वेळ दिला जावा.”
सुनावणी दरम्यान कपिल सिब्बल यांनी न्यायालयाची अशी मागणी केली की, सोनम वांगचुक यांना त्यांच्या पत्नीसोबत काही लिखित गोष्टींची देवाण-घेवाण करण्याची परवानगी द्यावी. यावर सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी स्पष्ट केले की, “त्यांना यामध्ये काहीही अडचण नाही, पण नजरकैदेचे कारण सांगण्यात झालेल्या विलंबाचा वापर ‘नजरकैदेविरोधात’ आधार म्हणून केला जाऊ नये.”