नवी दिल्ली, ३० मे (हिं.स.) : भारतातील दोन शहीद जवानांचा संयुक्त राष्ट्रांतर्फे दिल्या जाणाऱ्या सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या डॅग हॅमरशोल्ड पदकाने ब्रिगेडियर अमिताभ झा आणि हवालदार संजय सिंह यांना मरणोत्तर सन्मानित करण्यात आले आहे.
या दोन शूर जवानांनी संयुक्त राष्ट्राच्या एका मोहिमेत शांतता स्थापनेसाठी दिलेल्या अतुलनीय योगदानाची दखल घेत संयुक्त राष्ट्रांनी हा गौरव प्रदान केला. हे पदक दरवर्षी अशा सैनिकांना दिले जाते, ज्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या शांती मोहिमेत सेवा बजावत असताना प्राणांची आहुती दिली आहे.
ब्रिगेडियर अमिताभ झा हे संयुक्त राष्ट्र विघटन पर्यवेक्षक दलात कार्यरत होते. ते गोलान हाइट्स या अत्यंत संवेदनशील भागात तैनात होते. त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये त्या भागातील संघर्षजन्य परिस्थितीवर आणि युद्धविरामाच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे हे प्रमुख होते.
दुसरे शहीद जवान हवालदार संजय सिंह हे डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोमध्ये तैनात होते. ते तेथील मोनुस्को (MONUSCO) या संयुक्त राष्ट्राच्या स्थिरीकरण मोहिमेचा भाग होते. या भागात शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात त्यांनी आपले प्राण गमावले.
संयुक्त राष्ट्रांकडून मिळणारा हा सन्मान केवळ या दोन शूर जवानांचा नव्हे, तर भारतीय सेनेच्या शांतता स्थापनेसाठी असलेल्या बांधिलकीचाही जागतिक स्तरावर गौरव आहे. या सन्मानामुळे भारताच्या आंतरराष्ट्रीय सहभागाला अधिक बळ मिळाले आहे.