सोलापूर, 3 मे (हिं.स.)।
उडान 2025 अंतर्गत प्रशासकीय कामात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यात येत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता(AI) कॉलिंग सेंटर द्वारे जिल्ह्यातील नागरिकांना फोन करून त्यांच्याकडून शासकीय योजनांच्या अनुषंगाने प्रश्न विचारून त्यांच्या विभागाकडे तक्रारी असतील तर त्याच्या डॅशबोर्डवर नोंदी घेतल्या जात आहे व त्या नोंदीच्या आधारे संबंधित तालुकाप्रमुख व विभाग प्रमुख त्यांच्या तक्रारीचे निवारण आठ दिवसात करतील. यातून संबंधित लाभार्थ्यांना शासकीय योजना व प्रशासकीय कामकाजचा लाभ गतिमान पद्धतीने मिळण्यास मदत होणार आहे. तरी सर्व संबंधित विभाग प्रमुख व तालुकाप्रमुख यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून हा उपक्रम यशस्वी करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित उड्डाण 2025 अंतर्गत प्रशासनात AI वापर उद्घाटन तसेच प्रशिक्षण कार्यक्रम उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी आशीर्वाद मार्गदर्शन करत होते.
जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले की, प्राथमिक स्तरावर पुरवठा विभाग शिक्षण आरोग्य महिला व बालविकास व पशुसंवर्धन या पाच विभागाचा समावेश करण्यात आला असून या पाच विभागाच्या अनुषंगाने कॉलिंग सेंटर मार्फत दररोज 15 ते 20 हजार नागरिकांना मोबाईलवर फोन केले जात असून त्यातील सहा ते सात हजार कॉल वर नागरिक विचारलेला प्रश्नाचे उत्तरे देऊन संबंधित विभागाशी आपले मत मांडत आहे. त्यानुसार डॅशबोर्डवर माहिती तयार होत असून कोणत्या विभागाशी जास्त तक्रारी आहेत तसेच कोणत्या ठिकाणी काय करणे आवश्यक आहे याची माहिती प्रशासनाला उपलब्ध होत असून त्यावर पुढील उपाययोजना करून शासकीय योजनांचा लाभ तसेच प्रशासकीय कामकाज अत्यंत गतिमान व सुलभ पद्धतीने करण्यासाठी याचा वापर करण्यास सुरुवात झालेली आहे, असे त्यांनी सांगितले.