नवी दिल्ली, 17 मार्च (हिं.स.) : पश्चिम बंगालच्या कोलकाता येथील आर.जी. कार येथील बलात्कार पिडीतेच्या पालकांना सर्वोच्च न्यायालयातून दिलासा मिळाला आहे. या प्रकरणाच्या सीबीआय मार्फत फेरचौकशीसाठी त्यांना हायकोर्टात अर्ज करण्याची मुभा असल्याचे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे.
कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरवर बलात्कार करुन तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी आज, सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने पीडितेच्या पालकांना सर्वोच्च न्यायालयाने कोलकाता उच्च न्यायालयात जाण्याची परवानगी दिली आहे. तसेच या प्रकरणाची नव्याने सीबीआय चौकशी करावी अशी मागणी करणारी पीडितेच्या पालकांची याचिकाही सर्वोच्च न्यायालयाने निकाली काढली आहे.
सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने असे निरीक्षण नोंदवले की अर्जदार (पीडितेचे पालक) कोलकाता उच्च न्यायालयात याचिका दाखल करू शकतात. पीडितेच्या पालकांसाठी वरिष्ठ वकील करुणा नंदी यांनी बाजू मांडली.