नवी दिल्ली, २५ जुलै – यूपीए सरकारच्या काळात ओबीसी समुदायाकडे दुर्लक्ष झाले, ही चूक होती आणि ती दुरुस्त करण्याचा आपला स्पष्ट निर्धार आहे, असे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी स्पष्ट केले. काँग्रेसशासित राज्यांमध्ये जातनिहाय जनगणना राबवली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. ते दिल्ली येथे आयोजित ‘भागीदारी न्याय महासम्मेलन’ या कार्यक्रमात बोलत होते.
राहुल गांधी म्हणाले, “देशातील खरी उत्पादक शक्ती म्हणजे ओबीसी, दलित आणि आदिवासी समाज. मात्र, त्यांना त्यांच्या श्रमाचे योग्य फळ मिळत नाही. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांनी ओबीसी समाजाचा इतिहास पद्धतशीरपणे पुसण्याचा प्रयत्न केला आहे.”
आपल्या माजी अनुभवांवर भाष्य करताना ते म्हणाले, “यूपीएच्या काळात ओबीसी समाजासाठी जे करायला हवे होते, ते मी करू शकलो नाही. ही चूक काँग्रेस पक्षाची नसून माझी वैयक्तिक चूक आहे. जर मला इतिहासाची जास्त माहिती असती, तर मी त्या वेळीच ही गरज ओळखली असती.”
जातनिहाय जनगणनेबाबत ते म्हणाले की, “आता आपण ती जनगणना अशा पद्धतीने करणार आहोत की जी अधिक व्यापक आणि परिणामकारक ठरेल. त्या वेळी ती झाली असती, तर कदाचित ती फक्त प्रक्रियाच राहिली असती. आता ही चूक सुधारण्याची वेळ आली आहे आणि काँग्रेसशासित राज्यांतूनच त्याची सुरुवात होईल.”
राहुल गांधी यांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेसचा ओबीसी समाजाच्या हितासाठीचा दृष्टीकोन पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला आहे.
