सोलापूर बाजार समिती निवडणूक लढविणार नाही
सोलापूर रमाई आवास योजनेतील तीनशे चौरस फूट चटई क्षेत्राची अट शिथिल करावी. वंचित अर्जदारांना लाभ द्यावा. या योजनेतील अनुदान वाढीसाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याची माहिती आ. विजयकुमार देशमुख यांनी दिली.आ. विजयकुमार देशमुख यांनी आज महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांची भेट घेतली. महापालिकेअंतर्गत प्रलंबित योजना सह विविध समस्या व प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे सार्वजनिक आरोग्य अभियंता वेंकटेश चौबे, माजी सभागृह नेते शिवानंद पाटील, नागेश भोगडे, किरण पवार आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
रमाई आवास योजनेतील 300 चौरस फूट चटई क्षेत्राच्या अटीमुळे अनेक अर्जदार वंचित आहेत. यामुळे खाली दीडशे चौरस फूट आणि वर दीडशे चौरस फूट असे चटई क्षेत्र ग्राह्य धरून वंचित लाभार्थ्यांनाही लाभ द्यावा. या योजनेतील अनुदान तुटपुंजे आहे. ते वाढविण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करणार असल्याचे पत्रकारांशी बोलताना आ. विजयकुमार देशमुख यांनी सांगितले.
सोलापूर शहराला एक दिवसा आड पाणी पुरवठा कसा करता येईल या बाबत तसेच सोलापूर शहरातील पाणी वितरण व्यवस्था सुधारण्यासाठी 892.42 कोटीचा रुपयाचा प्रस्ताव डी. पी. आर लवकरात लवकर सादर करणे बाबत चर्चा करण्यात आली. तसेच माता रमाई आवास योजना व पंतप्रधान आवास योजना बाबतच्या विविध तांत्रिक अडचणींवर चर्चा करण्यात आली. बुधवार पेठ सफाई कामगार वसाहत आणि जुना बोरामणी नाका, 256 गाळे येथील इमारती धोकादायक झाल्या असल्या कारणाने त्या पाडून बि ओ टी तत्वावर किंवा अन्य योजनेतून लवकरात लवकर नवीन इमारती बांधणेबाबत चर्चा करण्यात आली. तसेच मड्डी वस्ती तुळजापूर नाका येथील महाबली हनुमान मूर्तीस महाराष्ट्र शासनाच्या परवानगी करिता जिल्हाधिकारी यांच्या कडे प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना देण्यात आल्या.
सोलापूर बाजार समिती निवडणूक लढविण्याची इच्छा नाही
सोलापूर बाजार समिती निवडणुकी संदर्भात विचारले असता आ. विजयकुमार देशमुख पुढे म्हणाले, यंदा सोलापूर बाजार समिती निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेत बदल करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील मतदार जास्त आहेत यामुळे यंदा मला निवडणूक लढविण्याची इच्छा नाही. निवडणूक लढविणार नाही. आता जे मतदान होणार आहे, ते सोसायटी आणि ग्रामपंचायत सदस्यांचे होणार आहे. पूर्वी शहरातील शहरी भागातील मतदार जास्त होते यंदा मात्र ग्रामीण भागातील मतदार जास्त असणार आहेत. त्यामुळे ही निवडणूक मी लढविणार नाही, असेही आ. विजयकुमार देशमुख यांनी स्पष्ट केले.
—–