अमरावती, 4 एप्रिल (हिं.स.) आमदार ,खासदारांना पेन्शन असू शकते तर आपली हयात शासनाच्या कामाकरिता घालवणारे शिक्षकांना जुनी पेन्शन का नको..? असा परखड सवाल राज्यकर्त्यांना करत माजी राज्यमंत्री बच्चू कडू आणि शिक्षकांच्या प्रलंबित समस्यांवर प्रथमच आपली आक्रमक भूमिका व्यक्त केली.
प्रहार शिक्षक संघटनेच्या अमरावती विभाग स्तरीय शिक्षक समस्या निवारण सभेचे आयोजन प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने पुरण पूर्ण येथे करण्यात आले होते. या सभेचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी राज्यमंत्री तथा प्रहार शिक्षक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू उपस्थित होते. या सभेला अमरावती विभागातील अमरावती अकोला, वाशिम, बुलढाणा ,यवतमाळ व इतर जिल्ह्यातूनही शेकडो शिक्षकांनी उपस्थिती लावली होती. या सभेत शिक्षकांनी अक्षरशः आपल्या समस्यांचा पाऊस पाडला.जिल्हा परिषद, खाजगी अनुदानित विनाअनुदानित, महानगरपालिका नगरपालिका व आश्रम शाळा या विभागात कार्यरत शिक्षक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.अनेक शिक्षकांनी आपल्या समस्याचा पाढा बच्चू कडू पुढे मांडला.
यावेळी सभेचे प्रास्ताविक या सभेचे निमंत्रक व प्रहार शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष महेश ठाकरे यांनी केले.आपल्या प्रास्ताविकातून त्यांनी प्रहार शिक्षक संघटनेची २०१६ पासून ची वाटचाल विशद करीत सध्या परिस्थितीत शिक्षकांच्या ज्वलंत प्रश्नांचा समस्यांचा पाढा वाचला.तसेच त्यांनी संघटनेचा गेल्या नऊ वर्षाचा कार्य अहवाल संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांना सादर केला.
याप्रसंगी समस्या निवारण सभेला संबोधित करताना बच्चू कडू यांनी राज्यकर्त्यांचा शिक्षकांच्या समस्यांवर चांगला खरपूस समाचार घेतला.शिक्षकांना जुनी पेन्शन मिळावी ,वैद्यकीय देयक तत्काळ देण्यात यावी, शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या, अंतर्गत बदल्या यातील पारदर्शकता कायम राहावी, शिक्षकांकडे अवाजवी कामे काढून घेण्यात यावी ,शिक्षकांना मानसिक स्थैर्य मिळावं, आदिवासी भागात कार्यरत शिक्षकांना प्रोत्साहन भत्ता ,अतिरिक्त घरभाडे भत्ता मिळावा, वस्ती शाळा शिक्षकांचे प्रश्न खाजगी अनुदानित शाळांना अनुदान, आश्रमशाळा शिक्षकांच्या समस्या, महानगरपालिकेतील शिक्षकांच्या समस्या यावर आपली आक्रमक भूमिका व्यक्त करत येणाऱ्या काळात शिक्षकांच्या समस्या करिता शासन दरबारी मोठे आंदोलन उभे करत ,
आवाज उठवू आणि बुलंद करू अशी भूमिका यावेळी मांडली. शिक्षकांना नाहक कुणी बदनाम करण्याचा प्रयत्न केल्यास त्यालाही परखडत प्रत्युत्तर देण्यात येणार असल्याचे सांगितले.विभागात सहा आमदार असताना सुद्धा शिक्षकांची समस्या सुटत नाही ही शोकांतिका असल्याची खंत देखील त्यांनी व्यक्त केली. लवकरच शिक्षकांच्या प्रलंबित समस्यांवर एक कृती कार्यक्रम ठरवून समस्यांचा निपटारा करणार असल्याचे ग्वाही या सभेच्या प्रसंगी त्यांनी दिली.