अमरावती, 4 एप्रिल (हिं.स.)
दहशतवादाशी मुकाबला करण्यासाठी उभारण्यात आलेल्या ‘फोर्स वन’चे प्रमुख अपर पोलिस महासंचालक कृष्णप्रकाश यांनी पोलिस आयुक्तालय गाठून पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक रामनाथ पोकळे, पोलिस उपायुक्त गणेश शिंदे, कल्पना बारवकर व सागर पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. पोलिस अधीक्षक विशाल आनंद या वेळी उपस्थित होते. कृष्णप्रकाश यांना शहर पोलिस आयुक्तालयाच्या प्रांगणात सलामी देखील देण्यात आली. त्यानंतर अप्पर पोलिस महासंचालक कृष्णप्रकाश यांनी पोलिस आयुक्तालयात आढावा बैठक घेतली. महाराष्ट्र सरकारने १६ वर्षांपूर्वी एनएसजीच्या धर्तीवर राज्यात फोर्स वन स्थापनेचा निर्णय घेतला.
त्यासाठी पोलिस दलातील निवडक कमांडो कठीण प्रशिक्षणासाठी निवडण्यात आले. आंतरराष्ट्रीय दर्जाचे फिजिकल आणि मेंटल ट्रेनिंग घेतलेली ३५० जवानांची ही फौज देशातील अन्य सुरक्षाबलांमध्ये उजवी ठरत आहे. केवळ देशातीलच नव्हे तर विदेशातील कमांडोंनाही प्रशिक्षण देण्याचा मान या फोर्सने मिळवला असल्याची माहिती कृष्णप्रकाश यांनी दिली. या वेळी अमरावती ग्रामीण पोलिस अधीक्षक असतानाच्या काही आठवणींना सुद्धा कृष्णप्रकाश यांनी उजाळा दिला.