सोलापूर, 20 मे (हिं.स.)। सोलापूर शहर आणि जिल्ह्यात अनेक प्रतिभाशाली उद्योजक आहेत. या उद्योजकांना आंतरराष्ट्रीय व्यापार करण्यास चांगली सुविधा उपलब्ध करण्यासाठी आगामी काळात दुबईमध्ये चांगला प्लॅटफॉर्म तयार करण्याचा आपला मानस असल्याचे प्रतिपादन आमदार सुभाष देशमुख यांनी केले.
सोलापूर सोशल फाउंडेशन आणि उद्योग फाउंडेशन, सोलापूर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आ. सुभाष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर शहरातील उद्योजकांचे शिष्टमंडळ दुबई दौर्यावर गेले होते त्याबाबतची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत आ. सुभाष देशमुख बोलत होते. ते पुढे म्हणाले की, शहरातील उद्योजकांचे शिष्टमंडळ दुबईला नेऊन त्यांना येतील उद्योजकांची माहिती सविस्तर द्यावी असा विचार आला. त्या दृष्टीने दुबई दौरा पार पडला. यावेळी विविध उद्योजकांच्या भेटी झाल्या. दुबईस्थित उद्योजकांची दर्जात्मक उत्पादन देण्याच्या अटीवर सोलापूरच्या उद्योग वाढीसाठी सकारात्मकाता दाखवली आहे. दुबईमध्ये जागा घेऊन तेथे उत्पादन स्टोअर करून सोलापुरातील उद्योजकांना आंतरराष्ट्रीय व्यापार करण्यास चांगली सुविधा उपलब्ध करण्यासाठी चांगला प्लॅटफॉर्म तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
यावेळी सोलापूर गारमेंट मॅन्युफॅक्चर असोसिएशनचे संचालक अमित जैन यांनी दुबई दौर्याविषयी सविस्तर माहिती दिली. दुबईमध्ये शिष्टमंडळाने सेक्युरिटी बिझनेस हेड संतोष कोरट यांच्याशी सायबर सिक्युरिटीमध्ये सोलापूरचे आयटी हब कसे निर्माण करता येईल यावर चर्चा केली. जुई केमकर व जितेंन दमानिया यांच्याशी फूड सेक्टरमध्ये सोलापूरच्या कृषी उत्पादनांना मोठी बाजारपेठ मिळवण्याबाबत विचार विनिमय केला. टेक्समास – टेक्स्टाईल मर्चंट्स ग्रुपला भेट दिली. त्यांनी सोलापूरच्या उद्योगजगांशी दीर्घकालीन भागीदारी सकारात्मक प्रतिसाद दिला. इंडियन पीपल फोरमचे अध्यक्ष अबुधाबी येथील जितेंद्र वैद्य यांनी शिष्टमंडळाची सदिच्छा भेट घेतली.
त्यांनी दुबई येथील नागरिकांचे संघटन करणे त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. सोलापूरसाठी डिझाईन ऑटोमेशन क्षेत्रात तरुणांना संधी देण्याचे आश्वासन दुबईस्थित सागर कुलकर्णी यांनी दिले. दुबई स्थित धनंजय दातार हे अल अदिल ट्रेडिंगचे चेअरमन आहेत त्यांनी सोलापुरातील खाद्यपदार्थ आणि इतर पारंपारिक व दर्जेदार कृषी उत्पादने विकत घेण्याचे आश्वासन दिले. शारजाह येथे शारजाह रीसर्च टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन पार्कला भेट देत संस्थेमधील वरिष्ठ अधिकार्यासह उद्योजकासोबत व्यापार गुंतवणूक व स्टार्टअपसाठी सरकारच्या संधीवर चर्चा करण्यात आली.
युनिफॉर्म उत्पादनात कार्य करणारे मॅथ्यू सुभाष यांच्याबरोबर युनिफॉर्म गारमेंट उद्योग वाढी संदर्भात सकारात्मक चर्चा झाली. या पत्रकार परिषदेला उद्यम फाउंडेशनचे सीईओ डॉ. राजेश गुराणी, युनिफॉर्म अँड गारमेंट्स विभागातून प्रकाश पवार, प्रशांत राठी, देव जैन श्रीनिवास बासूतकर,अभिजीत मालानी, विवेक सोनथालिया, यश रंगरेज, महेश रच्चा, अल्पेश संकलेचा, प्रदीप जैन, यश जैन, सागर गड्डम , मुरलीमोहन बुरा, आनंद झाड आदी उपस्थित होते.
दुबई बिजनेस फोरमची निर्मिती
या शिष्टमंडळाने जवळजवळ 30 ते 32 उद्योजकांची भेट घेत विविध विषयांवर सकारात्मक चर्चा केली. या शिष्टमंडळाच्या माध्यमातून सोलापूर दुबई बिजनेस फोरम तयार करण्याचे ठरले. ज्याच्या माध्यमातून कोणत्याही उद्योजकाला सोलापुरातून दुबईला जायचे असेल तर त्याला लागणारी काही मदत असेल तर हे फोरम सर्वतोपरी मदत करेल.