वॉशिंग्टन, ७ जून, (हि.स.) – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सहयोगी आणि उद्योगपती इलॉन मस्क यांचा व्हाईट हाऊसकडे
वाढता ओढा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ट्रम्प यांच्याशी मतभेद झाल्यानंतर आता इलाॅन
मस्क स्वतःचा नवा राजकीय पक्ष स्थापन करण्याचा विचार करत आहेत.
इलॉन मस्क यांनी अमेरिकेच्या
जनतेपुढे स्वतःचा राजकीय पक्ष स्थापन करण्याची कल्पना मांडली. ट्रम्प यांच्या
टीकास्त्रांनंतर मस्क यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर २२ कोटी
फॉलोअर्ससाठी मतदान (पोल) घेतले. त्यामध्ये त्यांनी विचारले की, “अमेरिकेत नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्याची वेळ
आली आहे का?”
मस्क यांनी सांगितले की,
सुमारे ८० टक्के फॉलोअर्सनी त्यांच्या या
विचाराला पाठिंबा दर्शवला आहे. त्यानंतर त्यांनी पोस्ट करत लिहिले, “हेच माझं नशीब असावं.”
यासोबतच त्यांनी एका
चाहत्याच्या सुचवलेल्या “अमेरिका पार्टी” या नावाला सुद्धा आपला पाठिंबा दर्शवला.
मात्र मस्क हे खरोखरच रिपब्लिकन पक्षापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतील का याबाबत
स्पष्टता नाही. तरीसुद्धा, मस्क हे
डोनाल्ड ट्रम्प यांच्या राजकीय प्रभावाला आव्हान देण्याचा प्रयत्न करत असल्याचं
घडामोडींवरून दिसून येत आहे. अमेरिकेतील
राजकारणात इलॉन मस्क यांची ही नवी पावले कोणते वळण घेतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
इलॉन मस्क यांना ट्रम्प यांच्या विरोधात बोलणं चांगलच महागात पडलं होतं. ट्रम्प यांच्याशी झालेल्या वादामुळे मस्क यांना विविध माध्यमांतून सुमारे 300 ते 350 कोटी डॉलर्सचा फटका बसला आहे.