छत्रपती संभाजीनगर, 30 जुलै – राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने मे 2025 मध्ये दिलेल्या निर्णयानुसार, चार महिन्यांत निवडणुका घेण्याचे निर्देश आहेत. मात्र, आवश्यक साधनसामग्री आणि मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे तयारीसाठी अधिक वेळ लागणार असल्याने राज्य निवडणूक आयोग सप्टेंबरमध्ये न्यायालयात मुदतवाढीसाठी अर्ज दाखल करणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली.
मराठवाड्यातील निवडणूक तयारीचा आढावा
वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती संभाजीनगर येथे मराठवाड्यातील निवडणूक तयारीचा आढावा घेण्यात आला. जिल्हा परिषद निवडणुकांनंतर महानगरपालिका निवडणुकांची तयारी होणार असल्याचे सूचित करण्यात आले. सर्व निवडणुका टप्प्याटप्याने घेण्याची शक्यता आहे.
2011 च्या जनगणनेनुसार अनुसूचित जाती-जमातींचे आरक्षण निश्चित केले जाणार आहे. सध्या मतदार यादी, प्रभाग व वॉर्ड रचना, आणि गट–उपगट आखणीची प्रक्रिया सुरू आहे. अद्याप मतदार याद्या तयार करण्यास तसेच आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करण्यास अधिकृत परवानगी मिळालेली नाही.
महानगरपालिका स्तरावरील तयारी
विभागीय आयुक्त कार्यालयात घेण्यात आलेल्या बैठकीत महानगरपालिका निवडणुकांसंदर्भातील सुविधांचा आढावा घेण्यात आला. मतदान केंद्र, ईव्हीएम, बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट, आणि मतमोजणी केंद्रांबाबत नियोजन करण्यात आले.
या बैठकीस विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, छत्रपती संभाजीनगरचे आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जालना, नांदेड, परभणी, लातूर येथील आयुक्त व जिल्हाधिकारी उपस्थित होते.
ईव्हीएम, मतदार यादी आणि तांत्रिक तयारी
वाघमारे म्हणाले, मतदार यादी तयार करणे हे निवडणुकीचे अत्यंत महत्त्वाचे काम आहे. प्रत्येक प्रभागातील मतदार त्याच प्रभागात मतदान करतील याची खात्री यादी तयार करताना घ्यावी. आवश्यकतेनुसार ईव्हीएम उपलब्ध करून देण्यात येणार असून, वापरलेल्या आणि न वापरलेल्या यंत्रांसाठी स्वतंत्र साठवणूक व्यवस्था केली जाणार आहे.
तसेच, निवडणूक प्रक्रियेसाठी अपडेट केलेले वेबसाइट आणि ॲप सामान्य मतदारांसाठी उपलब्ध राहतील. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त जी. श्रीकांत यांनी बैठकीत सीसीटीव्ही यंत्रणेच्या तयारीबाबत माहिती दिली.