लखनौ : वाहनांवर जातीवाचक नाव लिहून रुबाब दाखविणाऱ्यांची आता खैर राहिलेली नाही. महाराष्ट्रातील एका सामाजिक कार्यकर्त्याच्या तक्रारीवरून पंतप्रधान कार्यालयाने उत्तर प्रदेशमध्ये अशा जातीसूचक नावे असलेल्या वाहनांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. यानंतर दुसऱ्याच दिवशी लखनऊमध्ये पहिली कारवाईची पावती फाडण्यात आली आहे. याबाबत कालच आदेश काढलेत.

दुचाकी किंवा चारचाकी वाहनांच्या काचांवर जातीवाचक नावाचा उल्लेख केल्यास कारवाई करण्यात येणार आहे. तसेच, गाडीच्या नंबरप्लेटवरही नावाचा उल्लेख केल्यास संबंधित गाडीमालकावर कारवाई करण्यात येईल. यासंदर्भात अतिरिक्त परिवहन आयुक्त मुकेश चंद्र यांनी राज्यातील सर्व आरटीओंना पत्र पाठवले आहे. तसेच, अशा वाहनांवर जप्तीची कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
कानपूरच्या राहणाऱ्या आशिष सक्सेना यांच्या वाहनाच्या मागील काचेवर ‘सक्सेना जी’ लिहिण्यात आले होते. झाले असे की, पोलिसांनी नेहमी प्रमाणे तपासणीसाठी गाडीला हात दाखविला. यावेळी पोलिसांनी कारच्या चालकाकडे वाहनाची कागदपत्रे मागविली. कागदपत्रे पाहिल्यानंतर कारच्या मागे जाऊन पाहिले तर मागच्या काचेवर ‘सक्सेना जी’ लिहिलेले दिसले. पोलिसांनी नुकताच आदेश आला होता, लगेच चलनही फाडत कार चालकाला जोरदार दणका दिला. हिंडोला पोलिसांनी ही कारवाई केली.
डिसेंबर महिन्याच्या सुरवातीला मुंबईच्या हर्षल प्रभू यांनी आयजीआरएसवर पंतप्रधानांना पत्र पाठवून उत्तर प्रदेशमधील वाहनांवर जातीसूचक किंवा धर्म सांगणारे स्टीकर लावले जात असल्याचा तक्रार केली होती. अशा प्रकारचे स्टीकर लावून सामाजिक ऐक्य आणि कायद्यांचा भंग केल्याचे पंतप्रधान कार्यालयाच्या निदर्शनास आणून दिले होते. यानंतर पीएमओने लगेचच उत्तर प्रदेश पोलिसांना यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार कारवाई चालू झाली आहे.
